पडघ्यात महावितरणच्या ४०० केव्ही वीज वाहिनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भाग सव्वा दोन तास अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:54 PM2017-12-09T16:54:22+5:302017-12-09T16:57:55+5:30
पडघा येथील महापारेशनच्या ४०० केव्ही वीज वाहनीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागात तब्बल सव्वा दोन तास ब्लॅक आऊटच्या त्रासाला सामोरे जावे लागले.
ठाणे - पडघा येथे महावितरणच्या ४०० केव्ही विजवाहिणीचा ब्रेकर तुटल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, बदलापुर आदी भागांत तीन तासाहून अधिक काळ वीज पुरवठा गायब झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख ग्राहकांना याचा फटका बसला. ठाण्यात वीज प्रवाह खंडीत झाल्याने पट्रोल पंपाच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान दुरुस्तीच्या कामाला साधारणपणे तीन ते चार तासांचा कालावधी गेल्यानंतर सर्व भागांचा वीज पुरवठा टप्याटप्याने सुरळीत करण्यात आला.
ठाण्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अचानक वीज प्रवाह खंडीत होण्याचा फटका बसला. कोणतीही सुचना न देता, वीज प्रवाह खंडीत झाल्याने ग्राहक चिंतेत होते. ठाण्यातील अनेक भागात वीज गायब झाली होती. घोडबंदर, कळवा, मुंब्रा, वागळेचा काही भाग यामुळे प्रभावीत झाला होता. नेमका काय प्रकार घडला हे समजणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे ठाण्यातील पट्रोल पंपावर दुपारच्या सुमारास वाहनांच्या रांगा कमी असतात. परंतु वीज प्रवाह खंडीत झाल्याने अनेक पंपाच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सीएनजी पंपाच्या ठिकाणी देखील रिक्षांच्या एक ते दिड किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या. केवळ ठाण्यातच नाही तर ग्रामीण भागही यात प्रभावीत झाला होता. तसेच डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर, बदलापुर आदी भागांना देखील याचा फटका बसला.
दरम्यान या संदर्भात महावितरणशी चर्चा केली असता त्यांनी वीज प्रवाह खंडीत होण्यामागचे कारण स्पष्ट केले. पडघा येथे पारेशनची ४०० केव्ही विजवाहिणीचा ब्रेकर तुटल्याने ही समस्या उदभवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महावितरणच्या ठाणे मंडळा अंतर्गत असलेला बराचसा भाग प्रभावित झाला होता. या बिघाडामुळे ठाणे मंडळा अंतर्गत सुमारे ५ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी १ पासून खंडित झाला होता, तरी हा पुरवठा दुपारी ३.१० वाजता पूर्ववत झाला.