'ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी, मागासवर्ग आयोगाला 450 कोटी द्यावे'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:54 PM2021-11-23T12:54:43+5:302021-11-23T12:55:13+5:30

भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी यांचे प्रतिपादन

'Thackeray government should stop cheating OBCs, pay Rs 450 crore to backward class commission', manisha choudhary | 'ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी, मागासवर्ग आयोगाला 450 कोटी द्यावे'

'ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी, मागासवर्ग आयोगाला 450 कोटी द्यावे'

Next
ठळक मुद्दे  ठाणे येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, उपाध्यक्ष सागर भदे उपस्थित होते. गेल्या दोन वर्षातील ठाकरे सरकारने ओबीसींची कशी फसवणूक केली आहे हे स्पष्ट केले

ठाणे : राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळे गमावले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरुपात मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक साडेचारशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार मनिषा चौधरी यांनी केली.
 
ठाणे येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, उपाध्यक्ष सागर भदे उपस्थित होते. गेल्या दोन वर्षातील ठाकरे सरकारने ओबीसींची कशी फसवणूक केली आहे हे स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, ठाकरे सरकारने अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाची अट पूर्ण करणारा नाही. राज्य निवडणूक आयोगानेही नुकतीच ८६ नगरपालिकांमध्ये अध्यादेशाच्या आधारे ओबीसींच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली पण त्यात स्पष्ट म्हटले आहे की, या अध्यादेशाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले असून आयोगातर्फे करण्यात येणारी सर्व कार्यवाही उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून असेल. अर्थात ओबीसींवरील टांगती तलवार कायमच राहिली आहे. फेब्रुवारीमध्ये राज्यातील ८५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसींसाठी पक्के आरक्षण दिले नाही तर समाजाला राजकीय आरक्षणाच्या मोठ्या संधीला मुकावे लागण्याचा धोका आहे.

आमदार चौधरी पुढे म्हणाल्या की, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०१९ रोजी सांगितले होते की, राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करून एंपिरिकल डेटा गोळा करावा. ठाकरे सरकारने हा आदेश वेळीच पाळला असता तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचले असते. पण ठाकरे सरकारने १५ महिन्यांमध्ये कोर्टाच्या सात तारखांमध्ये केवळ वेळकाढूपणा केला आणि अखेरीस मार्च, २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. केवळ महाराष्ट्र राज्यातच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, ओबीसींना टिकावू स्वरुपात राजकीय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत एंपिरिकल डेटा गोळा केला पाहिजे. पण त्यासाठी ठाकरे सरकार मागासवर्ग आयोगाला निधी पुरवत नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर लगेचच मार्च महिन्यात हे काम हाती घेतले असते तर आतापर्यंत काम पूर्ण झाले असते. त्यांनी सांगितले की, ठाकरे सरकारचा ओबीसींच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उदासीन आहे. फडणवीस सरकारने ओबीसींसाठी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी या सरकारने रोखली आहे. एकूणच ठाकरे सरकारने दोन वर्षांत ओबीसींची फसवणूक केली आहे.
 

Web Title: 'Thackeray government should stop cheating OBCs, pay Rs 450 crore to backward class commission', manisha choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.