ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 07:17 AM2023-07-07T07:17:16+5:302023-07-07T07:17:23+5:30
ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.
ठाणे: शिंदे गटाचे आठ ते दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य या केवळ वावड्या असून, ठाकरे गटाचेच काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून लवकरच स्फोट होईल, असा दावा शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
मंत्रिपदावरून दोन आमदारांमध्ये संघर्ष झाला असल्याच्या बातम्या टीआरपी वाढवण्यासाठी पेरल्या जात असून, सरकार चांगले काम करत असल्याने ते अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भविष्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, अजित पवार यांच्या सरकारमधील प्रवेशानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, यामध्ये कोणत्याच प्रकारचे तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी मतदारसंघातील विकासकांमाच्या संदर्भात चर्चा केली.
शब्द पाळणारे नेते
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास सरनाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशा चर्चा होत्या. मात्र, मला मंत्रिपद मिळणार हे कोणत्या ज्योतिषाने सांगितले, असा उलट प्रश्न सरनाईक यांनी प्रसार माध्यमांना केला. दुसरीकडे सत्तेत वाटेकरी वाढले असले, तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेली अनेक वर्षे काम करत असून, हे दोन्ही नेते शब्द पाळणारे असल्याचे त्यांनी सांगितले.