शिंदेंना आव्हान देण्यास ठाकरे आज ठाण्यात; पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झाडणार पायधूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 06:41 AM2023-01-26T06:41:22+5:302023-01-26T06:41:35+5:30

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या प्रथमच ठाण्यात येणार आहेत.

Thackeray in Thane today to challenge Shinde | शिंदेंना आव्हान देण्यास ठाकरे आज ठाण्यात; पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झाडणार पायधूळ

शिंदेंना आव्हान देण्यास ठाकरे आज ठाण्यात; पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झाडणार पायधूळ

Next

ठाणे  :

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या प्रथमच ठाण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येऊन प्रजासत्ताकदिनी ते बंडखोरांचा समाचार कसा घेणार, याची उत्सुकता आहे. स्व. आनंद दिघे यांच्या शुक्रवारी असलेल्या जयंतीपूर्वी ते ठाण्यात हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उद्या ठाण्यात असून तेही दिघे यांच्या समाधीस्थळी जातील अशी शक्यता आहे. 

उद्धव हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे महाआरोग्य शिबिराचे उद्घाटनासाठी येणार आहेत. सकाळी १० वाजता हे शिबिर सुरू होईल. शिवसेनेला पहिली सत्ता ही ठाण्यानेच दिली होती. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच ठाण्याने मागील २९ वर्षे शिवसेनेला सलग सत्ता दिली. मात्र, सहा महिन्यांपूर्वी शिंदे यांनी फारकत घेत शिवसेनेला मोठा धक्का दिला. ठाण्यातील शिवसेनेत मोठी फूट पडली. 

मागील सहा महिन्यांत एकदाही ठाकरे ठाण्यात आले नव्हते. मधल्या काळात आदित्य ठाकरे यांनी दोन ते तीन वेळा ठाण्यात हजेरी लावली. रश्मी ठाकरे या देखील ठाण्यात येऊन गेल्या. नवरात्र उत्सवाला उद्धव  ठाण्यात येतील, अशी शक्यता होती. मात्र, ते फिरकलेच नाहीत. आता प्रथमच ते ठाण्यात येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये वारे संचारले आहे.

दिघेंच्या नावाचा वापर करण्याचे ठरवले
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव व प्रतिमा यांचा वापर शिंदे करीत आहेत. त्यामुळे आनंद दिघे यांच्या नावाचा व प्रतिमेचा वापर करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. दिघे यांचा वारसा पूर्णपणे शिंदे यांच्याकडे जाऊ द्यायचा नाही, असा ठाकरे यांचाही प्रयत्न आहे. मुख्यमंत्री हेही उद्याच शक्तीस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. 

Web Title: Thackeray in Thane today to challenge Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.