मीरा भाईंदरच्या नाट्यगृहाचे काम ठाकरे सरकार मार्गी लावणार- प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 08:58 PM2020-01-09T20:58:51+5:302020-01-09T20:59:38+5:30
याच वर्षात वाजणार नाटकाची घंटा
मीरारोड - मीरा भाईंदर वासियांसाठी पहिल्या नाट्यगृहाचे काम गेले दिड वर्ष तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय न घेतल्याने रखडले असल्याचा गौप्यस्फोट करत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात अंतर्गत सजावटीच्या कामासाठी टिडिआर देण्याचा निर्णय होऊन याच वर्षी हे नाट्यगृह कला रसिकांसाठी खुले केले जाईल अशी खात्री शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिका विकास आराखड्यातील शिवार उद्यान जवळ मोक्याच्या जागी असणारे नाट्यगृहाचे आरक्षण प्रशासन व राजकारण्यांनी संगनमताने पुर्वी विकासकाच्या घशात घातल्याने त्यावरुन आता वाद सुरु आहे. तर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असताना कला रसिकांसाठी नाट्यागृहच नसल्याने त्यांना मुंबईला जावे लागते. त्यातुनच आ. सरनाईक यांनी नागरिकांना नाट्यगृह मिळावे म्हणुन दहिसर चेकनाका जवळ महामार्गालगत असणाराया सुविधा भुखंडात नाट्यगृह बांधण्याची मागणी सातत्याने चालवली होती. २०१५ साली सदर प्रस्तावित नाट्यगृहाचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भुमिपुजन झाले होते.
परंतु त्या नंतर सदर नाट्यगृहाची इमारत बांधण्यासह आतील फर्निचर आदी सजावटीसाठी होणारा खर्च करण्यास महापालिकेने असमर्थता दर्शवली. अखेर विकासकाला टिडिआर देऊन त्या मोबदल्यात नाट्यगृहाच्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले. नाटट्यगृहाच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पुर्ण होत आले असुन आतील फर्निवर आदी साठी देखील पालिकेने पैसा नसल्याचे कारण देत हात आखडता घेतला. त्यामुळे फर्निचर आदी सजावट सुध्दा ठाणे व अकोला महापालिकेच्या धर्तिवर टिडिआर मधुन करुन घ्यावे असा प्रस्ताव शासना कडे पाठवण्यात आला. परंतु पालिकेतील सत्ताधारी भाजपा कडुन यात खोडा घातला जात असल्याचा आरोप होत असतानाच सदर प्रस्ताव गेले दिड वर्ष फडणवीस सरकारने अडवुन ठेवल्याचा गौप्यस्फोट सरनाईकांनी केला आहे.
या नाटट्यगृहासाठी सुमारे ५५ ते ६० कोटींचा खर्च आहे. आज गुरुवारी आ. सरनाईकांसह आयुक्त बालाजी खतगावकर , शहर अभियंता शिवाजी बारकुंड , नगररचनाकार दिलीप घेवारे , कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदी अधिकारायांनी कामाची पाहणी केली. तसेच अंतर्गत सजावटीच्या कामाचा आढावा घेतला. नाट्यागृहाचे बांधकाम झाले असले तरी अंतर्गत सजावटीचे काम सुरु होणे बाकी आहे. या अंतर्गत सजावटीसाठी सुमारे २७ कोटींचा खर्च आहे.
विकासक टिडिआरच्या माध्यमातुन अंतर्गत सजावटीचे काम देखील करण्यास तयार आहे. तशी विनंती पालिकेकडून या विकासकाला केली गेली आहे. मात्र टीडीआर देण्यासाठी राज्य सरकारची विशेष परवानगी आवश्यक असताना गेले दीड वर्ष याबाबतची फाईल आधीच्या फडणवीस सरकारच्या काळात नगरविकास खात्यात मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे काम अडले आहे. आता राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील गतिशील सरकार असल्याने नाट्यगृहाचे पुढील काम मार्गी लागेल. लवकरच टिडिआर द्वारे सजावटीच्या कामास सरकार मंजुरी देईल असा विश्वास आ. सरनाईकांनी बोलुन दाखवला.
याच वर्षात नाटट्यगृहाचे काम पुर्ण होऊन ते कला रसिकांसाठी खुले होईल अशी. भुमिपुजन जसे उध्दव यांच्या हस्ते झाले तेसेच उद्घाटन देखील त्यांच्याच हस्ते होईल. प्रसिध्द वास्तु विशारद हाफिज कॉन्टॅक्टर यांनी नाट्यगृहाचा आराखडा तयार केला आहे. या मध्ये मुख्य नाट्यगृह एक हजार आसन क्षमतेचे तर एक मिनी थिएटर ३०० आसन क्षमतेचे आहे. आर्ट गॅलेरी आहे. याच वर्षात नाटकाची घंटा या नाट्यगृहात वाजेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.