सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात पाठिंबा
By सुरेश लोखंडे | Published: March 17, 2023 05:51 PM2023-03-17T17:51:29+5:302023-03-17T17:51:46+5:30
जिल्हा शाखेचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळ यांची माहिती
सुरेश लोखंडे, ठाणे: जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय, निमशासकीय, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या चवथ्या दिवशी शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात जाऊन या बेमुदत संपाला पाठिंबा दिला. जिल्हा शाखेचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळ यांनी ही माहिती दिली.
बेमुदत संपात उतरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या संघटनांसह राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेसह धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनीही या संपाला पाठिंबा दिला. जिल्हा प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र संपात तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज रखडले आहे.
राज्य शासनाने फक्त संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेणे अपेक्षित आहे; पण अधिकारी,कर्मचारी यांच्या कॉमन तक्त्यामधील एकूण व उपस्थितांची आकडेवारी चुकीच्या पध्दतीने मागितली जात आहे, असा आरोप गव्हाळे यांनी केला. या संपात वर्ग एक व दोनचे अधिकारी सहभागी नसतानाही त्यांच्या उपस्थितीची माहिती मागवण्याची गरज नाही; पण त्यांचीही माहिती मागवून शासन उपस्थितांच्या संख्येबाबत संभ्रम निर्माण करीत असल्याचे गव्हाळे यांनी सांगितले.