ठाकरेसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी धनंजय बोडारे, ठाकरेसेनेत जल्लोष
By सदानंद नाईक | Published: June 13, 2024 03:32 PM2024-06-13T15:32:33+5:302024-06-13T15:33:43+5:30
ठाणे व कल्याण लोकसभेत ठाकरेसेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्यावर, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नवीन नियुक्त्या केल्या आहेत.
उल्हासनगर : ठाकरेसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख पदी धनंजय बोडारे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली. या नियुक्तीने ठाकरेसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी जल्लोष केला असून पक्ष बळकट करण्याचे आश्वासन बोडारे यांनी दिले आहे.
ठाणे व कल्याण लोकसभेत ठाकरेसेनेचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्यावर, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नवीन नियुक्त्या केल्या आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केला. बोडारे यांच्यावर राजकीय दबाव आल्याने, त्यांनी शिंदेंसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात होते. रिक्त झालेल्या जिल्हाप्रमुख पदी पक्षाचे जिल्हा समन्वयक व चंद्रकांत बोडारे यांचे लहान बंधू धनंजय बोडारे यांची वर्णी लागली आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय बोडारे यांनी पक्षाच्या उमेदवारांचा एकहाती प्रचार केला होता. त्यामुळेच श्रीकांत शिंदे यांना गेल्या वर्षीच्या मताचा विक्रम मोडता आला नाही. बोडारे यांनी गेल्यावेळी कल्याण पूर्व विधानसभा निवडणूक लढवून गणपत गायकवाड यांना टक्कर दिली होती.
कल्याण पूर्व विधानसभेचे भावी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. ठाकरेसेनेने त्यांच्या उमेदवारीला मूक संमती दिल्याची चर्चाही सुरू झाली आहे. शहरात चंद्रकांत बोडारे व धनंजय बोडारे यांनी शिवसेना वाढविली. मात्र लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत बोडारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे धनंजय बोडारे यांनी ठाकरेसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न केले. बोडारे यांनी महापालिकेचे उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, कल्याण जिल्ह्या समन्वयक आदी महत्वाची पदे भूषविली असून ते सतत ६ वेळा नगरसेवक पदी निवडून आले आहेत.