ठाण्यात काळया जादूसाठी मांडूळाची दीड लाखांमध्ये तस्करी करणा-या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 08:38 PM2017-12-12T20:38:39+5:302017-12-12T21:11:14+5:30
मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने ठाण्याच्या बाळकुम नाका येथून सोमवारी रात्री एका मांडूळासह तिघांना अटक केली.
ठाणे : काळी जादू जादू करण्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा करीत ३० लाखांचे मांडूळाची दीड लाखांमध्ये तस्करी करणा-या संदीप बोडके (२४), कैलास पाटील (५०) आणि शिवाजी आहेर (२७) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने बाळकुम नाका येथून सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेले हे मांडूळही हस्तगत करण्यात आले आहे.
मांडूळ प्रजातीचा दुर्मिळ सर्प (वन्यजीव) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, उपनिरीक्षक सरक, हवालदार सुभाष मोरे, नाईक पंढरीनाथ पाटील आणि गायकवाड आदींच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास नाशिक येथून मांडूळासह आलेल्या संदीप बोडके आणि शिवाजी आहेर तसेच त्यांचा भिवंडी कोळीवाडा येथील साथीदार कैलास अशा तिघांना बाळकूम जकात नाक्याजवळील रस्त्याच्या कडेला या पथकाने सापळा ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १७७० ग्रॅम वजनाचा आणि ४४ इंच लांबीचे दुर्मिळ मांडूळ हस्तगत करण्यात आले. या तिघांनाही वन्यजीव कायद्यानुसार बाळगण्यास बंदी असलेल्या या मांडूळाच्या तस्करीप्रकरणी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..............................
काळी जादूसाठी विक्री
मांडूळाचा काळी जादूचा चांगला उपयोग होतो, अशी बोडके याने बतावणी केली होती. मांडूळ जवळ बाळगल्यास मोठया प्रमाणात पैसा येतो, अनेक चांगली कामे होतात, असा एक समज काळी जादू करणाºयांकडून पसरविला जातो. तसेच काही आजार बरे करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. या समजातूनच दोन तोंडाच्या मांडूळाला काळया जादूवर अंधविश्वास ठेवणा-यांमध्ये मोठी मागणी आहे. याच मागणीमुळे त्याची मोठया प्रमाणात लाखो रुपयांमध्ये विक्री होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वीही दोघांना अटक
दुर्मिळ मांडूळाच्या तस्करीप्रकरणी यापूर्वीही ठाणे गुन्हे शाखेने ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातून कल्याणच्या संदीप पंडित आणि अनंता घोडविंदे या दोघांना २१ मार्च रोजी अटक केली. हे दोघेही ग्राहकांच्या शोधात असतांनाच तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यांच्याकडून २५ लाखांचा एक किलो ५० ग्रॅम वजनाचा एक तर दुसरा ३० लाखांचा एक किलो ९०० ग्रॅम वजनाचा असे दोन सर्प जप्त करण्यात आले होते.