बनावट दस्ताऐवजाद्वारे पासपोर्ट बनवून परदेशात प्रवास करणारा ठकसेन जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:13 AM2021-07-15T00:13:15+5:302021-07-15T00:18:53+5:30
खोटया नावाने बनावट दस्ताऐवज तयार करुन पासपोर्ट बनवून परदेशात प्रवास करणारा कुख्यात गुन्हेगार सय्यद तुबलानी (रा. दहिसर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: खोटया नावाने बनावट दस्ताऐवज तयार करुन पासपोर्ट बनवून परदेशात प्रवास करणारा कुख्यात गुन्हेगार सय्यद तुबलानी (रा. दहिसर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या दहिसर भागातील रहिवाशी असलेला सय्यद अब्बास तुबलानी याने जसीम रेधाल तुबलानी हे नाव धारण करुन त्या नावाची बनावट कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात जाऊन आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाळे, जगदीश मुलगीर, जमादार संजय भिवणकर, सत्यवान सोनवणे, सुरेश मोरे, अंकुश भोसले, हवालदार मोहन चौधरी आणि कल्याण ढोकणे आदींच्या पथकाने गोपनीय चौकशी केली. यात सय्यद अब्बास तुबलानी यास पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मंजूर झाल्याची माहिती समोर आली. हा पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविला असल्याचेही उघड झाल्याने मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे पत्रव्यवहार करुन जसीम रेधाल तुबलानी या बनावट नावाने त्याने मुंबईतून परदेशात प्रवास केल्याचीही बाब समोर आली. त्यानुसार १३ जुलै २०२१ रोजी सय्यद अब्बास रेधाल तुबलानी उर्फ जसीम रेधाल तुबलानी हा ठाकूरपाडा, दहिसर, ठाणे येथे येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी सुरा, बनावट पॅनकार्ड, चालक परवाना मिळाला. त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह पासपोर्ट अॅक्ट १२ (ंअ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
* आंध्रप्रदेशातही गुन्हा दाखल-
जसीम तुबलानी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा तसेच आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील चंद्रायानगुट्टा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थाच्या तस्करीचा गुन्हा नोंद असून मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यातही अन्य एक गुन्हा दाखल आहे.