ठाकुर्ली पुलाची आता जबाबदारी पालिकेवर, कोपर पूलही कमकुवत : एलेव्हेटेड पुलाची निविदा रखडलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:50 AM2017-08-21T06:50:02+5:302017-08-21T06:50:02+5:30
कोपरचा पूल कमकुवत झाल्याने ठाकुर्लीतील उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचे काम कल्याण-डोंबिवली पालिकेला करावे लागेल. त्यासाठी रेल्वेमार्गावरून गर्डर टाकण्याचे काम रेल्वेने वेळेत पूर्ण केले आहे. मात्र, या उड्डाणपुलाला जोडून असलेल्या महत्त्वाच्या एलेव्हेटेड रोडच्या कामाला पालिकेने अजून सुरुवातही केलेली नाही.
डोंबिवली : कोपरचा पूल कमकुवत झाल्याने ठाकुर्लीतील उड्डाणपूल वेळेत पूर्ण करण्याचे काम कल्याण-डोंबिवली पालिकेला करावे लागेल. त्यासाठी रेल्वेमार्गावरून गर्डर टाकण्याचे काम रेल्वेने वेळेत पूर्ण केले आहे. मात्र, या उड्डाणपुलाला जोडून असलेल्या महत्त्वाच्या एलेव्हेटेड रोडच्या कामाला पालिकेने अजून सुरुवातही केलेली नाही.
गर्डरच्या कामासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकची कल्पना असल्याने आणि पावसामुळे प्रवाशांची संख्या कमी होती. तरीही, रिक्षाचालकांनी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांत अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवाशांची लूट केली. या मार्गावरील भाडे न ठरल्याचा फायदा उचलत रिक्षाचालकांनी प्रवाशांची कोंडी केली. बहुतांश चालकांनी समांतर रस्त्याने रिक्षा नेल्याने या रस्त्यावर वाहतूककोंडी होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनसेवेच्या बसने ११२ फेºया केल्या. ही व्यवस्था सुरळीत आहे की नाही, याची पाहणी महापौर राजेंद्र देवळेकर, परिवहन समितीचे
सभापती संजय पावशे यांनी केली. मात्र, अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमधून चालत जाऊन डोंबिवली व कल्याण स्थानक गाठले.
रेल्वेच्या हद्दीतील गर्डर टाकण्याचे काम १२ कोटींचे होते. त्याचा निम्मा खर्च कल्याण-डोंबिवली महापालिकेने उचलला. गर्डरनंतर आता पुलाचे काम पूर्ण करून डोंबिवली स्थानकाच्या दिशेने दिवाळीपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, एलेव्हेटेड रस्त्याच्या कामाची निविदा अद्याप पालिकेने काढलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. त्याचा खर्च ४० कोटी आहे. या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यावर ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील फाटक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज लोकल वाहतूक खोळंबते.
डोंबिवली- कोपरदरम्यानचा रेल्वेचा उड्डाणपूल धोकादायक बनला असून सध्या त्याच्यावरच वाहतुकीचा ताण आहे. ठाकुर्लीचा उड्डाणपूल सुरू झाल्यास कोपरच्या पुलावरील वाहतूक तेथे वळवता येईल. या पुलाची डागडुजी गरजेची असल्याने त्यासाठी पुरेसा वेळ देता येईल किंवा गरजेनुसार हा धोकादायक बनलेला पूल पाडून नव्याने बांधण्याचे नियोजनही पालिकेला करता येईल.