ठाकुर्लीच्या नागरिकांना पादचारी पूलावर जाण्यासाठी अडथळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 08:17 PM2017-10-10T20:17:46+5:302017-10-10T20:18:15+5:30
रेल्वे पादचारी पूलांवरील फेरिवाल्यांमुळे अडथळे होत असतांनाच डोंबिवली ठाकुर्ली रस्त्यावर असलेल्या पादचारी पूलावर जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे सामान अस्ताव्यस्त असल्याने नागरिक पाठ फिरवत आहेत.
डोंबिवली: रेल्वे पादचारी पूलांवरील फेरिवाल्यांमुळे अडथळे होत असतांनाच डोंबिवली ठाकुर्ली रस्त्यावर असलेल्या पादचारी पूलावर जाण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे सामान अस्ताव्यस्त असल्याने नागरिक पाठ फिरवत आहेत. त्यामुळे या पूलाकडे दुर्लक्ष होत असून सोय असूनही त्याचा फारसा वापर होत नाही. केडीएमसीने याकडे लक्ष द्यावे, अडथळे हटवावेत आणि नागरिकांसाठी सोय करुन द्यावी अशी मागणी होत आहे.
पूर्वेकडे ठाकुर्लीत जाण्यासाठी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी आदी ठिकाणी जाण्यासाठी तर पश्चिमेला बावनचाळ, गणेशनगर, डी बिल्डिींग यासह राजू नगर आदी ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना या पूलाचा वापर करता येतो. मात्र काही महिन्यांपासून या ठिकाणी ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम सुरु आहे, त्यासाठी लागणारे गर्डर, सळया यासंह अन्य सामान त्या पूलाच्या पाय-यांनजीक टाकण्यात आले आहे. त्यामुळे तेथे जातांना नागरिकांना अपघाताची शक्यता आहे. परिणामी नागरिक तेथून जाणे टाळतात. बहुतांशी नागरिक रेल्वे फाटकामधून पूर्व-पश्चिम जातात. तर काही गणेशमंदिरालगतच्या पादचारी पूलाचा वापर करतात. नागरिकांनी या पूलाचा वापर वाढवावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत ते होणे आवश्यक आहे. त्याकडे परिसरातील नागरिकांनी लक्ष वेधले. अन्यथा या ठिकाणीही गैरव्यवहार सुरु होतील. अनेकदा युवक वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचे सांगण्यात आले.
पूलाचा वापर अधिकाधीक करण्यासाठी त्यासमोरील अडथळे हटवावेत, आणि परिसराची स्वच्छता राखावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत. उड्डाणपूल झाल्यावर या पूलाचा वापर सर्वाधिक होणार असून त्याच्या डागडुजीकडेही वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. गणेश मंदिर नजीकच्या पादचारी पूलाची डागडुजी सुरु झाली आहे, त्यातच या ठिकाणीही आवश्यकता असेल ते काम करण्यात यावे असेही नागरिकांचे म्हणणे आहे.