ठाकुर्लीत अडथळ््यांची शर्यत
By admin | Published: April 11, 2017 02:28 AM2017-04-11T02:28:57+5:302017-04-11T02:28:57+5:30
रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाच्या व नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या मेकओव्हरला सुरुवात झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला होम
डोंबिवली : रेल्वेच्या इतिहासातील महत्त्वाच्या व नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या मेकओव्हरला सुरुवात झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला होम प्लॅटफॉर्म, कल्याण दिशेकडील पादचारी पूल आणि तिकीटघराचे रविवारी उद्घाटन झाले. मात्र अनेक कामे शिल्लक असल्याने तेथील अडथळ््यांची शर्यत कायम आहे. संपूर्ण स्थानकाचा विकास होण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कल्याण दिशेच्या नव्या पादचारी पुलामुळे दिलासा मिळाला असला, तरी सध्या तो होम प्लॅटफॉर्मलाच जोडण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यावर तो जुन्या फलाटाला जोडला जाईल. तोवर सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना रुळ ओलांडूनच फलाट गाठावा लागेल किंवा नवीन पुलाने होम प्लॅटफॉर्मवर उतरून कल्याण दिशेकडील लोकलमधून फलाट ओलांडण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार आहे.
बहुतांश गर्दी डोंबिवली दिशेच्या फाटकातूनच येते. त्यामुळे नवीन पुलाचा वापर सध्या मर्यादित आहे. पण होम प्लॅटफॉर्म डोंबिवली दिशेच्या पुलाला जोडलेला नाही. त्यामुळे तेथे पोचणे त्रासदायक आहे. नव्या फलाटावरून थेट फाटकापाशी जाण्याची सोय नाही. गेटमनच्या चौकीमागून दोन-चार केबिन व स्टोअर रूमला वळसा घालून फलाटात शिरावे लागत आहे. नवीन तिकीट घरही होम प्लॅटफॉर्मवर असल्याने पूर्वेतील प्रवाशांना रोज हा वळसा घालावा लागेल. तिकीट काढल्यानंतर मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फलाटावर पोचणे काही काळ तरी त्रासाचे ठरणार आहे. त्यामुळे पूर्व बाजूला डोंबिवलीच्या दिशेला तिकीट घर बांधण्याची मागणी पुढे येत आहे. पूर्वेला कल्याणच्या दिशेला बांधण्यात येत असलेल्या तिकीट घराचे कामही सध्या सुरू आहे. (प्रतिनिधी)
फलाटात गॅप
रूळ सरकवल्यामुळे होम फलाट (१-अ) आणि जुना (क्र. १) या फलाटातील अंतर वाढले आहे. प्रवासी सोयीनुसार जुन्याच फलाटावर उतरतात. त्यामुळे प्रवाशांनी तेथे उतरू नये, अशी जागृती रेल्वे करत आहे. त्यासाठी फलक लावले आहेत. मात्र, ते उंचावर असल्याने प्रवाशांच्या नजरेस पडत नाहीत.
अवजड वाहनांना
प्रवेश बंदी
रेल्वे फाटकात होणारी कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना फाटकातून जाण्यावर डोंबिवली शहर वाहतूक उपविभागाने बंदी घातली आहे. त्याऐवजी त्यांना कोपर ओव्हरब्रिजचा पर्याय दिला आहे. मात्र, वाहनचालकांनी तो धुडकावल्याने फाटक दीर्घकाळ खुले राहात आहे.