ठाकुर्ली... स्थानक आणि परिसर ‘मेकओव्हर’च्या वाटेवर
By admin | Published: January 23, 2017 05:34 AM2017-01-23T05:34:21+5:302017-01-23T05:34:21+5:30
सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे
सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे दक्षिण-उत्तर भारतात धावू लागली. १९२५ मध्ये विजेवर चालणारी इंजिने आली. त्यावेळी टाटांकडून वीज घेतली जात होती. मात्र, विजेबाबतीत स्वावलंबी असावे, यासाठी ब्रिटिशांच्या जीयआयपी रेल्वे या कंपनीने १९२९ मध्ये भारतातील पहिले वीज निर्मिती केंद्र ठाकुर्ली येथे सुरू केले. हे केंद्र ‘चोळा पॉवर हाऊस’ किंवा ‘कल्याण बिजली घर’ म्हणून ओळखले जात होते. त्यासाठी ठाकुर्ली खाडीनजीक १९१६ पासून १०० एकर जागा संपादित केली गेली. १९२९ ते १९८७ अशी ५८ वर्षे या पॉवर हाउसमध्ये टप्प्याटप्प्याने १३६ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी दररोज ३० वॅगन दगडी कोळसा लागायचा. तो मध्य प्रदेश, झारखंड, बिहारहून येई. ठाकुर्ली खाडीच्या गोड्या पाण्याची बॉयरलरमध्ये वाफ केली जात असे. त्यासाठी कोळसा वापरला जात होता. ही वाफ वीज जनित्रांना पुरवली जायची आणि वीज निर्मिती होत असत. या पावर हाऊसमधील वीज मुंबई, लोणावळा आणि इगतपुरीदरम्यान वापरली जात होती. या पॉवर हाऊसमध्ये इंग्लंड, जर्मनी, जपानमधून आयात केलेली टर्बाइन आणण्यात आली होती. डिसेंबर १९८७ मध्ये या पॉवर हाऊसमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्यात ४०० डिग्री से. इतक्या तापमानाच्या वाफेने आठ कर्मचारी भाजून मृत्युमुखी पडले. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी वीजनिर्मिती हे रेल्वेचे काम नसल्याचे जाहीर केल्याने डिसेंबर १९८७ पासून हे पॉवर हाउस बंद पडले. भविष्यात याच पॉवर हाऊसमध्ये देशातील पहिले एलिव्हेटेड (उड्डाण) टर्मिनस उभे राहणार आहे.
१९२९ ला पॉवर हाऊसच्या निर्मितीमुळे ठाकुर्ली स्थानक अस्तित्वात आले. डोंबिवली पश्चिमेला असलेल्या मोठागाव ठाकुर्ली या गावाच्या नावावरून स्थानकाला ते नाव पडले. सुरुवातीला येथे फलाटही नव्हते. शिड्यांच्या आधारे प्रवासी गाडीत चढ-उतार करत असत. पुढे फलाटाची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासून रेल्वेच्या दृष्टीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक महत्त्वाचे होते. पूर्वेला असलेल्या १२ बंगला परिसरात ब्रिटीश अधिकारी, तर पश्चिमेला ५२ बंगल्यात कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था होती. आता पूर्वेला बंगला परिसराचा ताबा आरपीएफकडे आहे. तेथे त्यांचे प्रशिक्षण स्थळ आणि निवास व्यवस्था आहे. ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला मिळून जवळपास २०० एकरांपेक्षा जास्त जागा रेल्वेच्या मालकीची आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील काही स्थानके ही कायमच उपेक्षित मानली गेली. त्यात ठाकुर्ली हे स्थानक होते. ठाकुर्ली ते कल्याण हा समांतर रस्ता तयार झाला. त्यामुळे याठिकाणच्या जागेला प्रचंड भाव आला. कांचनगाव, खंबाळपाडा, ठाकुर्ली स्टेशन विभागात १२ मजली व त्याहून अधिक उंचीचे टॉवर उभारले जात आहेत. लोकवस्ती वाढल्याने ठाकुर्ली स्थानकाचा वापरही वाढला. प्रवासी संख्या वाढत असली, तरी सोयी सुविधांची वानवा असल्याने रेल्वेकडे १९९८ पासून तत्कालीन स्थानिक भाजपा नगरसेवक श्रीकर चौधरी हे स्थानक विकासाच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला २०१६ मध्ये यश आले आहे.
रेल्वेने कल्याण दिशेला पादचारी पूल आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यासाठी ३० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी १७ कोटी रुपये खर्चून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या पश्चिमेला होम प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. त्यात सध्या पादचारी पुलावर असलेली तिकीट खिडकी आता होम फ्लॅटफॉर्म खाली येणार आहे. पादचारी पूलावर चढून तिकीट काढण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार नाही. पूर्वेलाही तिकीट खिडकी असावी, अशी चौधरी यांची मागणी आहे.