ठाकुर्लीतील ९० फूट रस्त्यावरील टॉवरमध्ये समस्यांची ढगफुटी, रहिवासी संतप्त

By प्रशांत माने | Published: September 16, 2023 01:29 PM2023-09-16T13:29:07+5:302023-09-16T13:29:44+5:30

Thakurli News: ठाकुर्लीतील रेल्वे मार्गालगत नव्वद फुटी रस्ता झाला. त्याच्या बाजूला १० वर्षांत गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. मात्र अंतर्गत रस्ते, वाहतुकीचे पर्याय, पथदिवे, वीजपुरवठा, पाणी, सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने, पार्किंग, बाजार, पोलिस चौकी या सोयी मिळालेल्या नाहीत.

Thakurli's 90-feet road tower has problems brewing, residents angry | ठाकुर्लीतील ९० फूट रस्त्यावरील टॉवरमध्ये समस्यांची ढगफुटी, रहिवासी संतप्त

ठाकुर्लीतील ९० फूट रस्त्यावरील टॉवरमध्ये समस्यांची ढगफुटी, रहिवासी संतप्त

googlenewsNext

- प्रशांत माने
डोंबिवली - डोंबिवली आणि कल्याण शहरांच्या मध्यभागी वसलेल्या आणि वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या ठाकुर्लीतील रेल्वे मार्गालगत नव्वद फुटी रस्ता झाला. त्याच्या बाजूला १० वर्षांत गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. मात्र अंतर्गत रस्ते, वाहतुकीचे पर्याय, पथदिवे, वीजपुरवठा, पाणी, सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने, पार्किंग, बाजार, पोलिस चौकी या सोयी मिळालेल्या नाहीत. राहणाऱ्यांच्या नशिबी समस्यांचीच ढगफुटी झाली आहे.

डोंबिवलीत शहरीकरणामुळे विकासासाठी भूखंडच शिल्लक न राहिल्याने विकासकांनी आपला मोर्चा ठाकुर्लीकडे वळविला. पश्चिमेला रेल्वे पॉवर हाऊस, ५२ चाळीला लागून असलेल्या गणेशनगरपासून पार खाडीपर्यंत आणि पूर्वेला चोळेगाव, खंबाळपाडा, कांचनगाव आणि पत्रीपुलापर्यंतची हद्द असलेला कचोरे परिसर ठाकुर्लीत मोडतो. या भागात विकासाला सुरुवात झाली त्यावेळी केडीएमसीने बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर ९० फुटी रस्त्याची उभारणी केल्याने या भागाला झळाळी प्राप्त झाली. परिसरात उभ्या राहणाऱ्या नवीन गृहसंकुलांमध्ये घरखरेदीकडे नागरिकांचा ओढा वाढला. मात्र मूलभूत सोयी-सुविधांचा हिशेब आता मतं मागायला आले की विचारू, असे लोक सांगतात.

थांबे उभे राहिले; पण बस धावली नाही
वाढती वस्ती पाहता जुलै २०१७ मध्ये इथल्या मार्गावरून केडीएमटीची बससेवा चालू करण्यात आली, पण ही नव्याची नवलाई काही दिवसच टिकली. परिणामी इथले बस थांबे आता जाहिरातींसाठी वापरले जातात.

सुस्थितीतील रस्त्याची दुरवस्था 
अनेक वर्षे ९० फूट रोड आणि रेल्वेला समांतर रस्त्यावर खड्डे नव्हते, पण सेवावाहिन्या आणि सांडपाणी वाहून नेण्याच्या कामासाठी वारंवार खोदकाम रस्त्याच्या मुळावर आल्याने हा रस्ता इतर रस्त्यांसारखा झाला. 

विकासकांनी गृहसंकुले उभारली असली तरी येथील रस्ते बनविणे आणि चौकांचे सुशोभिकरण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. विकासकांकडून अंतर्गत सर्व सुविधा पुरविल्या जातात. परंतु बाहेरील रस्ते, पाणी, पार्किंग आदींची जबाबदारी पालिकेची आहे. त्यादृष्टीने त्यांचेही नियोजन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
- विहंग पुसाळकर, विकासक

 ठाकुर्ली स्थानकात येण्यासाठी सक्षम पर्याय 
नाही. अनेकजण दुचाकीने येतात. मात्र, पार्किंगची ठोस व्यवस्था नाही. 
 वाहनतळाअभावी म्हसोबा चौकात उघड्यावर वाहनचालक त्यांची वाहने उभी करून रेल्वेस्थानक गाठतात. त्यातून वाहनचोरीचे प्रकार घडतात.
  वाहनतळासाठी जागा आरक्षित असताना त्या ठिकाणी स्मशानभूमी उभी केली गेली. 
 उड्डाणपुलाचे काम ठाकुर्ली स्थानकापर्यंत येऊन थांबले. पुढे म्हसोबा चौकातील समांतर रस्त्यावर उतरणाऱ्या पुलाचे काम सात महिने बंद आहे. 
 डोंबिवलीतून ठाकुर्लीकडे 
ये-जा करणारी वाहतूक मारुती मंदिर चौकात अडकून पडते. 
 हा रस्ता चिंचोळा असल्याने त्या ठिकाणी सकाळ-
संध्याकाळ वाहतूककोंडीचे चित्र दिसते.

सांडपाणी निचरा होण्यात अडचणी
गृहसंकुलातील सांडपाणी निचरा होणारी वाहिनी केडीएमसीच्या मुख्य वाहिनीला जोडलेली नाही. खोदकामांमुळे रस्ते सुस्थितीत नाहीत. बिल्डरांनी रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली, पण त्यांची निगा राखली जात नाही. केडीएमसीकडे पाठपुरावा करूनही काहीही होत नाही.
- राजेंद्र देशमाने
रहिवासी रेल्वे समांतर रस्ता, ठाकुर्ली 


फेरीवाल्यांचे आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या आणि स्टॉलचे अतिक्रमण हा कळीचा मुद्दा आहे. ठाकुर्ली परिसरात महापालिकेचे प्रशासकीय कार्यालय व्हावे.
- दीपक भोसले
रहिवासी, ९० फुटी रोड, ठाकुर्ली

Web Title: Thakurli's 90-feet road tower has problems brewing, residents angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.