ठाकुर्लीचा ‘तो’ पूल होणार इतिहासजमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:19 AM2019-01-23T01:19:07+5:302019-01-23T01:19:16+5:30
ठाकुर्ली रेल्वेस्थानकातील मुंबई दिशेकडील जुना अरुंद पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार आहे.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वेस्थानकातील मुंबई दिशेकडील जुना अरुंद पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार आहे. जुन्या पुलापासून काही अंतरावरच नवा पूल बांधण्याचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) हाती घेतले आहे. त्याकरता फलाट क्रमांक १ आणि २ च्या मध्ये पत्रे ठोकल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून चिंचोळ्या जागेतून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठाकुर्ली स्थानकातील हा पादचारी पूल १९८० च्या दशकातील आहे. प्रवाशांच्या वाढत्या लोंढ्यापुढे तो तोकडा पडत आहे. पुलाखालून गाड्या जाताना त्याला हादरे देखिल बसत आहेत. भविष्यात कोणताही अपघात होऊ नये, यासाठी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने नवा पूल बांधण्याचे आवश्यकता आहे. त्यासाठीचे काम सुरू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.
नवीन पुलाच्या कामासाठी फलाट क्रमांक १ आणि २ मध्ये पत्रे लावल्याने लोकल आल्यावर प्रवाशांना तेथून वाट काढणे अडचणीचे ठरत आहे. लोकल आल्यावर जुन्या पुलाच्या दिशेने ये-जा करणाऱ्यांना खोळंबून रहावे लागत आहे. महिलांचे डबे तेथे येत असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, नवीन पूल नेमका किती लांबी, रुंदीचा असेल, याची माहिती रेल्वे अधिकाºयांकडून मिळाली नाही.
>वारंवार पाठपुरावा
ठाकुर्ली स्थानकाचे विस्तारीकरण झाल्यानंतरही मुंबई दिशेकडील पुलाची डागडुजी झालेली नव्हती. शिवाय रेल्वे फाटक बंद केल्याने प्रवाशांना त्या अरुंद पुलावरून ये-जा करणे त्रासाचे होत होते.
नवा पूल व्हावा, पुलाच्या जिन्यांची रुंदी वाढावी, आदी मागण्या भाजपाच्या नगरसेविका प्रमिला चौधरी, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी तसेच प्रवासी संघटना, मनसे, शिवसेनेच्या रेल्वे समितीने केल्या होत्या. खा. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता.