अंगणवाडी संघाचा जि.प.समोर थाळीनाद
By admin | Published: December 24, 2015 01:30 AM2015-12-24T01:30:27+5:302015-12-24T01:30:27+5:30
सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याने शासकीय सेवेत असूनही अंगणवाडी आशा स्वयंसेविका व कंत्राटी कामगारांना या शिफारशींचा फायदा मिळणार नसल्याने
पालघर : सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याने शासकीय सेवेत असूनही अंगणवाडी आशा स्वयंसेविका व कंत्राटी कामगारांना या शिफारशींचा फायदा मिळणार नसल्याने ‘‘सबका साथ सबका विकास’’ ही मोदी सरकारची घोषणा फक्त काही मूठभर कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी तर इतर कर्मचाऱ्यांचे जीवन भकास करणार असल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या हजारो कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात पालघर जिल्हापरिषदेवर थाळीनाद मोर्चा बुधवारी नेला होता, त्यावेळी हा आरोप करण्यात आला होता.
भारत सरकारने नेमलेल्या सातव्यावेतन आयोगाने शिफारशी सादर केल्यानंतर केंद्रसरकारच्या ४७ लाख कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढ होणार आहे. तर केंद्र सरकारच्या ४२ लाख पेन्शनर्सच्या पेन्शनमध्ये २४ टक्के वाढ करताना अत्युच्च अधिकाऱ्यांचे पगार ९० हजारावरून थेट २.५० लाखापर्यंत वाढविण्यात आले आहेत. या शिफारशी जाहीर केल्यानंतर राज्यशासनाचा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी शासकीय व निमशासकीय सेवामधील चतुर्थ श्रेणीमधील सुमारे १.७५ लाख पदे टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रयत्न शासन करणार असल्याचे मोर्चेकरांचे म्हणणे आहे. या नोकर कपातीमुळे काही खातील तुपाशी व बहुसंख्य राहतील उपाशी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. हा वेतन आयोगाचा बोजा भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाचा डाव आहे, असा आरोप करण्यात आला.
सातव्या वेतन आयोगाचा लाभ केवळ कायम कर्मचाऱ्यांनाच मिळणार असल्याने शासकीय सेवेत असूनसुद्धा लाखो कर्मचारी व आशा स्वयंसेविका, कंत्राटी, आरोग्यसेविका, सफाई कामगार यांना त्यांचा काहीही फायदा मिळणार नाही.संघटीत कामगार क्षेत्रातील सेवाशर्ती ठरविताना असंघटीत क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने समन्यायी व सर्वसमावेशक विचार केला पाहिजे असे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे. तसेच कंत्राटी व मानधनी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, त्यांना वेतन आयोगाचा लाभ द्या, अनुसूचित क्षेत्रातील गरोदर मातांना एकवेळच्या सकस आहार देण्यासाठी अमृत आहार योजनेसाठी शासनाने प्रती दिन फक्त २५ रू. खर्चाची तरतूद केली असल्याने ती दुप्पट
करावी.
अंगणवाडी सेविका व मदतनिसाना गरोदर माता व स्तनदा माताना शिजवून देण्यासाठी मिळणारा २५० रू. चा मोबदला वाढवून १ हजार करण्यात यावा. इ. मागणीसाठी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा एम. ए. पाटील, उपाध्यक्ष मंगला सराफ, सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता.