भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन
By नितीन पंडित | Published: November 20, 2023 06:27 PM2023-11-20T18:27:18+5:302023-11-20T18:27:59+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन.
भिवंडी: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेत मागील वीस ते बावीस वर्षांपासून मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार अल्प मानधना वर काम करीत असून,सर्व कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे ,तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने सोमवारी भिवंडीत उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर थाळीनाद आंदोलन करीत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला आहे.
भिवंडीत समितीचे पदाधिकारी शामराव पाटील,सतीश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भिवंडी महानगर पालिका, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत शेकडोच्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी झाले होते.शासकीय सेवेत सामावून घ्यावे तोपर्यंत समान काम समान वेतन द्यावे या मागणीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.२५ दिवसां पासून आंदोलन सुरू असताना सुध्दा राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत आहे.आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या आश्वासना नंतर ही त्याची अमलबजावणी करीत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज थाळीनाद आंदोलन केले परंतु आता कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत शासनाने बघू नये अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करून आत्मदहन आंदोलन करू असा इशारा जिल्हा सहसचिव सतीश देशपांडे यांनी दिला आहे.