ठामपा शहरात नेट झीरोची संकल्पना राबवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:15 AM2017-07-18T02:15:30+5:302017-07-18T02:15:30+5:30
ठाणे महापालिकेने मागील काही वर्षांपासून अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सौरऊर्जेचा वापर सुरू केला आहे. सौर शहरीकरण योजना तसेच स्मार्ट सिटीअंतर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेने मागील काही वर्षांपासून अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सौरऊर्जेचा वापर सुरू केला आहे. सौर शहरीकरण योजना तसेच स्मार्ट सिटीअंतर्गत नवीन व अपारंपरिक ऊर्जेवर आधारित विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. यापुढेही जाऊन नेट झीरो ही संकल्पना राबवण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे महापालिकेची स्वत:ची वार्षिक विजेची गरज अंदाजे ९५० लक्ष युनिट एवढी आहे. नेट झीरो संकल्पना राबवण्यासाठी महापालिका क्षेत्रात नवीन व अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून विविध सेवांसाठी लागणाऱ्या वार्षिक वीज वापराइतकी वीज निर्माण करण्याचे पालिकेने आता निश्चित केले आहे. यासाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून ६३ मेगावॅट क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. यापैकी १० मेगावॅट एकत्रित क्षमतेपैकी ६.५ मेगावॅट प्रकल्प उभारणीचे काम पालिकेने सुरू केले आहे. उर्वरित ५३ मेगावॅट क्षमता साध्य करण्यासाठी पालिकेने योग्य त्या तंत्रज्ञानावर आधारित व परिमाणीत तसेच उपलब्ध जागेला साजेशी नवीन व अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची पीपीपी तत्त्वावर टप्प्याटप्प्याने उभारणी करण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यानुसार, नेट झीरोचा प्रकल्प राबवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेवर आधारित प्रकल्पांची उभारणी, संचलन, निगा, देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांकडून पीपीपी तत्त्वावर स्पर्धात्मक निविदा मागवल्या जाणार आहेत. शहराच्या हवामानाला सर्वात योग्य व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या नेट मीटरिंग किंवा त्या वेळेस उपलब्ध असलेल्या धोरणांतर्गत विद्युत वितरण कंपनीशी जोडण्यात येणार आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीच्या प्रचलित दरापेक्षा कमी दराने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालिकेचा फायदा होणार आहे. तसेच पालिकेला शहरातून होणाऱ्या हरित गृहवायूचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे.