ठामपाच्या लिपीकाला ४५ हजारांची लाच स्वीकारतांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 07:12 PM2021-04-19T19:12:08+5:302021-04-19T19:14:31+5:30
तीन वर्षांच्या कालावधीतील एलबीटी टॅक्स कमी करण्याच्या मोबदल्यामध्ये ५० हजारांची मागणी करुन ४५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शरद उघाडे (५५) या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तीन वर्षांच्या कालावधीतील एलबीटी टॅक्स कमी करण्याच्या मोबदल्यामध्ये ५० हजारांची मागणी करुन ४५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शरद उघाडे (५५) या ठाणे महापालिकेच्या लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील एका व्यापाºयाच्या मालकीचा ठाणे येथे स्टेशनरीचा व्यवसाय आहे. २०१३ ते २०१६ या वर्षाचा एलबीटी टॅक्स कमी केल्याचा मोबदला म्हणून ठामपाचे लिपीक शरद उघाडे यांनी त्यांच्याकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची १९ एप्रिल २०२१ रोजी एसीबीकडून पडताळणी करण्यात आली. तेंव्हा ही मागणी केल्याचे उघड झाल्याने एसीबीने सोमवारी ठाणे महापालिकेच्या माजीवडा येथील एलबीटी कार्यालयात सापळा लावला. याच सापळयात उघाडे यांना ४५ हजारांची लाच स्वीकारतांना कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.