ठामपा म्हणते कोविडचे ५७ मृत्यू, मात्र स्मशानातील नोंद सांगते ४९०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:52+5:302021-04-14T04:36:52+5:30

ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडादेखील वाढू लागला आहे. प्रत्यक्षात झालेले मृत्यू आणि महापालिका ...

Thampa says Kovid had 57 deaths, but the cemetery records say 490 | ठामपा म्हणते कोविडचे ५७ मृत्यू, मात्र स्मशानातील नोंद सांगते ४९०

ठामपा म्हणते कोविडचे ५७ मृत्यू, मात्र स्मशानातील नोंद सांगते ४९०

Next

ठाणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडादेखील वाढू लागला आहे. प्रत्यक्षात झालेले मृत्यू आणि महापालिका जाहीर करीत असलेली आकडेवारी यात तब्बल ४३३ मृत्यूंची तफावत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण कोविड स्मशानभूमीत जाळण्यात आलेल्या गेल्या ११ दिवसांतील मृतांचा आकडा हा ४९०च्या घरात असून, याच कालावधीत महापालिकेने जाहीर केलेला आकडा हा केवळ ५७ एवढाच आहे. त्यामुळे मृत व्यक्तींच्या आकड्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला असून, ठाण्यात नेमके किती मृत्यू झाले हे आता गुलदस्त्यात आहे.

ठाणे महापालिका हद्दीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, मृत्यूंची टक्केवारीदेखील वाढली आहे. दररोज स्मशानभूमीमध्ये प्रेते जाळण्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. यापूर्वी महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्युदर हा २ टक्क्यांच्या आसपास होता. आता तो ७.३ टक्क्यांच्या घरात गेला आहे. हा आकडा केवळ पालिकेच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात महापालिका हद्दीत रोजच्या रोज मृत्यूंचा आकडा वाढताना दिसत आहे. स्मशानभूमीत काम करणाऱ्या कामगारांशी या संदर्भात चर्चा केली असता, जेव्हापासून शहरात कोरोना वाढत आहे, तेव्हापासून आमचा ताण वाढल्याचे ते सांगत आहेत.

ठाणे महापालिकेने तीन स्मशानभूमींमध्ये कोविडचे मृतदेह जाळण्यासाठी सुविधा निर्माण केली आहे. यामध्ये मुख्य स्मशानभूमी जवाहरबाग, कळवा येथील स्मशानभूमी तसेच वागळे स्मशानभूमीचा समावेश आहे. या तीन स्मशानभूमींमध्ये दररोज १४ ते १७ मृत्यूंची नोंद होत आहे. यात सर्वाधिक मुख्य स्मशानभूमीमधील आकडा मोठा आहे. मात्र, महापालिका प्रशासन जाहीर करीत असलेली मृत्यूंची आकडेवारी आणि प्रत्यक्षात या तीन स्मशानभूमीत नोंद करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे. मुख्य स्मशानभूमीत मागील ११ दिवसांत २४० मृत्यूंची नोंद रजिस्टरवर झाली आहे, तर कळवा आणि वागळे स्मशानभूमीत अनुक्रमे १०३ आणि १४७ मृत्यूंची नोंद झाली असून, महापालिका प्रशासनाच्या डॅशबोर्डनुसार ही आकडेवारी केवळ ५७ इतकी असल्याने उर्वरित मृत्यूंच्या संदर्भात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या नोंदीतही घोळ

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या जाहीर केली असून, यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत एकूण एक हजार ५११ मृत्यू दाखवले आहेत. मात्र. ठाणे महापालिकेच्या रेकॉर्डनुसार आतापर्यंत एक हजार ४५७ मृत्यू दाखवले असल्याने या आकडेवारीवरूनही घोळ समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आकडेवारी लपविली जाते आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

११ दिवसांत ठाणे महापालिकेने जाहीर मृत्यू

तारीख मृत्यू

१ एप्रिल - ५

२ एप्रिल - ३

३ एप्रिल - ५

४ एप्रिल - ५

५ एप्रिल - ५

६ एप्रिल - ४

७ एप्रिल - ५

८ एप्रिल - ७

९ एप्रिल - ६

१० एप्रिल - ५

११ एप्रिल - ७

---------------

एकूण - ५७

गेल्या ११ दिवसातील कोविड स्मशानभुमीतील मृत्यूंची नोंद

----------------------------------------------

मनीषानगर स्मशानभूमी - १०३

मुख्य स्मशानभूमी (जवाहरबाग) - २४०

वागळे स्मशानभूमी - १४७

---------------------------------

एकूण - ४९०

Web Title: Thampa says Kovid had 57 deaths, but the cemetery records say 490

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.