ठामपाचे सहायक आयुक्त सुनील मोरे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:54 AM2020-10-01T00:54:50+5:302020-10-01T00:54:59+5:30
आयुक्तांनी केली कारवाई : दिवा प्रभाग समितीमधील फाइलचोरी भोवली
ठाणे : दिवा प्रभाग समिती कार्यालयातून संगणक आणि महत्त्वाच्या फाइल्स चोरी प्रकरणात अडकलेले तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांच्यावर बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिनकुमार शर्मा यांनी कारवाईचा बडगा उगारून त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मोरे यांच्यासह फिरोज खान या दोघांवर शीळ-डायघर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी डॉ. सुनील मोरे यांच्यावर कलम ३८० (चोरी), ४०९, (सरकारी मालमत्ता चोरणे) तसेच ३४ (गुन्हेगारी संगनमत) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या ज्या दिवशी बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री संगणक आणि फाइल चोरीला गेल्या होत्या. यावेळी दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात सहायक आयुक्त
मोरे आल्याची नोंद सुरक्षारक्षकांनी केली होती. आयुक्तांनी १७ आॅगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी तर दिवा प्रभाग समितीचे सहायक मोरे यांची निवडणूक विभागात बदली केली होती. मात्र, ज्या दिवशी या बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री उशिरा दिवा प्रभाग समिती कार्यालयातील संगणक आणि
काही महत्त्वाच्या फाइल चोरीला
गेल्या होत्या.
मोरे रात्री आले होते कार्यालयात
ठाणे महापालिका मुख्यालयातून दोन संगणक दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांच्या मागणीनुसार मागवण्यात आले होते. प्रभाग समितीच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार आणि कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार १७ आॅगस्ट रोजी सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.४६ वाजता मोरे पुन्हा दिवा प्रभाग समिती कार्यालयात आल्याची नोंद असल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळली होती.