ठामपाचे बँक खाते सील होता होता वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:51+5:302021-08-24T04:43:51+5:30
ठाणे : कोरोनामुळे ठाणे महापालिकेवर आर्थिक संकट ओढवल्याने आर्थिक स्थिती खालावली आहे. अशातच महापालिकेवर बँक खाते सील होण्याची शक्यता ...
ठाणे : कोरोनामुळे ठाणे महापालिकेवर आर्थिक संकट ओढवल्याने आर्थिक स्थिती खालावली आहे. अशातच महापालिकेवर बँक खाते सील होण्याची शक्यता निर्माण झाली होती; परंतु प्रशासनाने अखेरच्या क्षणी भविष्य निर्वाह निधीची रक्कम व्याजासह भरल्याने ही नामुष्की टळली आहे.
महापालिकेने २०११-२०१६ या कालावधीत ठोक पगारावर घेतलेल्या अनुकंपा आणि वारसा हक्कावरील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली नव्हती. ही बाब भविष्य निर्वाह निधीच्या लेखा विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पालिकेला २०१८ मध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतरही महापालिकेने ती भरली नव्हती. अखेर संबंधित प्रशासनाने बँक खाते सील करण्याची नोटीस पाठविल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पाच कोटी नऊ लाखांची रक्कम भरल्याने मोठे संकट टळले.
महापालिकेने २०११ ते २०१६ या कालावधीत सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना सरळ सेवेत घेण्याऐवजी मानधनावर घेतले होते. त्यानंतर त्यांना ठोक स्वरुपात कामावर रुजू करून घेतले. त्यानंतर या २०११ ते २०१६ या कालावधीत त्यांंची भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणे अपेक्षित होते, परंतु ती भरलीच नाही. ही रक्कम चार कोटींच्या आसपास होती. ती वेळेत भरली न गेल्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने महापालिकेला नोटीस बजावून त्यात दंडाची रक्कमही आकारून ती १० कोटींच्या आसपास गेली होती.
यासंदर्भात पालिकेने पाठपुरावा केल्यानंतर ही रक्कम पाच कोटी नऊ लाख भरण्याच्या सूचनाही भविष्य निर्वाह निधीने दिल्या होत्या. त्यानंतरही महापालिकेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याची नोटीस धाडली. यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने दोनच दिवसांपूर्वी ही रक्कम भरल्याने बँक खाते सील होता होता वाचले.