मेट्रोच्या मार्गात ठामपाच्या जलवाहिनीचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:43 AM2019-04-10T00:43:11+5:302019-04-10T00:43:20+5:30
२७ कोटींचा खर्च अपेक्षित : काम पूर्ण होण्यास लागणार ३ वर्षे; कोंडीत पडणार भर
अजित मांडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वडाळा ते कासारवडवली या मेट्रोच्या कामामुळे सध्या ठाण्याच्या विविध भागांत वाहतूककोंडी होत आहे. परंतु, आता येत्या काही दिवसांत तीत आणखी भर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, तिच्या मार्गात ठाणे महापालिकेच्या जवळजवळ अडीच किमीपर्यंतची जलवाहिनी आड आली आहे. त्यामुळे ती आता स्थंलातरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सध्या ज्या ठिकाणी मेट्रोचे बॅरिकेड्स लावले आहेत, त्याच माजिवडा ते थेट लुईसवाडीपर्यंत ही जलवाहिनी येत असल्याने ती स्थलांतरित करावी लागणार आहे. यामुळे या भागात वाहतूककोंडीत आणखी भर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या ठाणे ते घोडबंदर-कासारवडवली या मार्गावर मेट्रोच्या मातीपरीक्षणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. यामुळे घोडबंदर भागात तर वाहतूककोंडी होत आहे. आता तीनहातनाका, नितीन कंपनी, माजिवडानाका या भागातही या बॅरिकेड्समुळे वाहतूककोंडी होत आहे. साधारणपणे तीन वर्षे हे काम पूर्ण करण्यासाठी जाणार आहेत. परंतु, आतापासूनच वाहतूककोंडी होऊ लागल्याने त्यावर पर्यायी मार्गांचा विचार सुरू आहे.
दरम्यान, ही जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी एमएमआरडीएने महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार, ती स्थलांतरित करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. परंतु, त्यासाठी होणारा खर्च हा एमएमआरडीएने करावा, अशी मागणी पालिकेने केली आहे. ती माजिवडा ते लुईसवाडी अशी अडीच किमीपर्यंतची असून ती अनेक वर्षे जुनी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ११०० मिमी व्यासाची, त्यानंतर ९०० मिमी आणि पुढे ७५० मिमी व्यासाची अशी ही जलवाहिनी आहे.
१३०० मिमी व्यासाची वाहिनी टाकणार
ही जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी सुमारे २७ कोटींचा खर्च अपेक्षित असून ती लुईसवाडीकडून पुढे जाणाऱ्या डाव्या बाजूकडील सर्व्हिस रोडच्या खालून टाकली जाणार आहे. परंतु, ती टाकताना भविष्याचा विचार करून १३०० मिमी व्यासाची वाहिनी टाकण्याची मागणीसुद्धा पालिकेने केली आहे. यासाठी अर्धा खर्च तरी पालिकेने उचलावा, अशी मागणी एमएमआरडीएने पालिकेला केली आहे. त्यानुसार, आता पालिकेच्या पातळीवर विचार सुरूझाला आहे. येत्या काही दिवसांत यावर तोडगा काढून काम सुरू होईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.