दिवाळीसाठी ठाण्याचे ‘ब्रॅण्ड’ सेलिब्रेशन, ठाणे होणार लख्ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:44 AM2017-10-07T01:44:29+5:302017-10-07T01:44:41+5:30
दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच
ठाणे : दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषणाईने ठाणे लख्ख चमकवण्यासाठी महापालिकेचे तब्बल ११० इंजिनीअर दिवसरात्र कामाला लागले आहेत. एकूणच ब्रॅण्ड ठाण्याचे ब्रॅण्डिंग करून ठाणेकरांबरोबर दिवाळीच जबरदस्त सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
शहराने स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू केली. परंतु, या स्मार्ट ठाण्यात आजही अनेक समस्यांना तोंड लागत आहे. खड्ड्यांतून मार्ग काढणे, घाणेरडे फुटपाथ, धुळीमुळे होणाºया प्रदूषणासह इतर समस्यांमुळे ठाणेकर पुरते हैराण आहेत. दिवाळीपूर्वी तरी यातून सुटका होणार का, असा सवाल त्यांच्याकडून होत आहे. ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी १० दिवसांपूर्वी सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेऊन दिवाळीपूर्वी चांगले रस्ते, खड्डेमुक्त प्रवास, विद्युत रोषणाई आदी कामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता नगरअभियंता अनिल पाटील यांनी तत्काळ याचे व्हिजन तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ११० इंजिनीअरची टीम आणि ६०० जणांचे पथक कामाला लागले आहे.
शहरातील ३ लाख ५९ स्क्वेअर मीटर परिसरात पेटिंग्जचे काम सुरू झाले आहे. पालिका आयुक्तांनी ब्रॅण्डिंग ठाण्याच्या ज्या तीन छटा सांगितल्या आहेत. त्या पेटिंग्जच्या माध्यमातून उमटल्या जात आहेत. त्यानुसार, या कामी खाजगी लोकसहभाग घेतला जात आहे. तसेच यामध्ये शहरातील १४१ किमीचे ९८ रस्ते आणि २२ चौक हे या माध्यमातून चकाचक केले जात आहेत. या ठिकाणी रस्त्यावर पडलेले १७०० खड्डे बुजवण्याबरोबर डिव्हायडरसह बॅरिकेट्स पेंटिंग आदींसह फुटपाथ, रस्ते धुलाईचीदेखील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याशिवाय, फुटपाथच्या बाजूला असलेल्या झाडांनादेखील ९ इंचांपर्यंत रंगरंगोटी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे, चौकांचे रूपडे पालटणार आहे. याशिवाय, रस्त्यावरील डेब्रिज उचलणे, गटार साफ करणे, कचरा उचलणे, ही कामेही केली जात आहेत. याशिवाय, शहरातील मुख्य गार्डन, तलावांचीदेखील साफसफाई केली जात आहे. येत्या १३ आॅक्टोबरपर्यंत ही कामे केली जाणार असून यामध्ये झाडांवर विद्युत रोषणाई करणे, मोठे लाइट लावणे, हाय वे चकाचक करणे या याकामांचादेखील समावेश आहे. एकूणच एखादा नागरिक जेव्हा दिवाळीची पहिली अंघोळ करून घराबाहेर पडेल, तेव्हा त्याला ब्रॅण्डिंग ठाण्याचे सेलिब्रेशन पाहावयास मिळावे, हा मुख्य उद्देश असल्याची माहिती प्रभारी नगरअभियंता अनिल पाटील यांनी दिली.