ठाण्यात १० सिग्नल फ्लॅश मोडवर, पाच वर्षांत सव्वा कोटीचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:40 AM2017-08-28T04:40:30+5:302017-08-28T04:40:43+5:30

शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे.

In Thane, 10 Signal Flash Models, Five Years In The Churn | ठाण्यात १० सिग्नल फ्लॅश मोडवर, पाच वर्षांत सव्वा कोटीचा चुराडा

ठाण्यात १० सिग्नल फ्लॅश मोडवर, पाच वर्षांत सव्वा कोटीचा चुराडा

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होऊन निष्पाप नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहे. त्याची जाणीव गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रखरतेने होत आहे. यास स्वयंचलित सिग्नल यंत्राही जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यावर, प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून ठाणे शहरातील सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर सुमारे २५ सिग्नल कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सिग्नलच्या देखभाल दुरुस्तीवर एक कोटी २५ लाख ३६ हजारांची रक्कम खर्चही झाली आहे. मात्र, त्यातील केवळ १५ सिग्नल कार्यरत असल्याचा दावा केला जात असून १० सिग्नल फ्लॅश मोडवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते नादुरुस्त असल्याचे दिसून येत असल्याने येथील वाहतूक बेशिस्तीत व मनमानी धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहराची लोकसंख्या, त्यातील वाहन संख्या ही जीव घेणारी ठरत आहे. अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. त्यासाठी जागोजागी असलेली सिग्नल यंत्रणा सतर्क केल्यास वाहतूक पोलिसांवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
गणेश चतुर्थीच्या मिरवणुकांप्रसंगी शहरातील बेशिस्त वाहतुकीचा फटका विघ्नहर्त्या गणरायालादेखील बसला आहे. तरीदेखील सिग्नल यंत्रणा व शहरातील वाहतूक सुरळीत असल्याचा दावा प्रशासनाकडून होत असल्याचे उघड झाले आहे. शहरात तीनहातनाका, अल्मेडा रोड, खोपटनाका, कॅटबरी, तुळशीधाम चौक, ब्रह्मांडनाका, विजय गार्डन, आनंदनगर, कासारवडवली, ओवळानाका, कोळशेत रोड, बाळकुम जकातनाका, जीपीओ, यशस्वीनगरनाका, वसंत विहार चौक आदी १५ सिग्नल सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. मात्र, सर्वाधिक वाहतुकीचे चौक व नाक्यांवरील सिग्नल यंत्रणा कुचकामी असून ते केवळ फलॅश मोडवर कार्यरत आहेत. यामध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग व एलबीएस महामार्ग, जुना आग्रा रोड आदींवरील वाहतुकीला तोंड देणारा टेलिफोन एक्स्चेंज चौकातील सिग्नल केवळ नामधारी आहे.
याप्रमाणेच वागळे चेकनाका, मानपाडानाका, खारेगावनाका, कोर्टनाका, पाटीलपाडा चौक, संत गजानन चौक, तीन पेट्रोलपंप, मनीषनगर जंक्शन आणि काशिनाथ घाणेकर चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणचे सिग्नल फ्लॅश मोडवर असूनही ते कार्यरत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
 

Web Title: In Thane, 10 Signal Flash Models, Five Years In The Churn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.