ठाण्यात १५ रुग्णालये सील, महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:34 AM2019-05-09T06:34:07+5:302019-05-09T06:34:33+5:30
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या १५ रुग्णालयांना ठामपा अग्निशमन दलाने सील ठोकले असून आरोग्य विभागाने त्यांची नोंदणीही रद्द केली आहे.
ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या १५ रुग्णालयांना ठामपा अग्निशमन दलाने सील ठोकले असून आरोग्य विभागाने त्यांची नोंदणीही रद्द केली आहे. यामध्ये वागळे इस्टेट परिसरातील सर्वाधिक पाच रुग्णालयांचा समावेश आहे.
अग्निशमनदलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणाऱ्या रु ग्णालयांवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ठामपा अग्निशमन दलाने संबंधित रुग्णालयांना ४८ तासांची नोटीस बजावून मंगळवारी आणि बुधवारी ही कारवाई केली.
ठाणे महानगरपालिका हद्दीत केवळ १८३ रु ग्णालयांतच अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम असल्याचे उघड झाले होते. अग्निशमन दलाने ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत करून तपासणीसाठी अर्ज सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार अग्निशामक दलाने काहींची तपासणी करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. परंतु, इतर रु ग्णालयांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे येथे उपचार घेणाºया रु ग्ण आणि कामाला असणाºया कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाºयावर असल्याचे उघड झाले होते. आजही या रुग्णालयांमध्ये हजारो रु ग्णांवर उपचार केले जात असून तेथील शेकडो कर्मचाºयांच्या सुरक्षेचाही प्रश्न कायम आहे.
यामुळे एप्रिल २०१८ मध्ये सपन श्रीवास्तव यांनी ठामपा हद्दीत अनेक रु ग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. यावरील सुनावणीत न्यायाधीश नरेश पाटील आणि अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने ठाण्यातील रूग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेची पाहणी करून याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. Þ
त्यानंतर पालिकेने अग्निसुरक्षा यंत्रणा प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र आदींबाबत या खाजगी रु ग्णालयांना नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ७० रुग्णालयांकडे अग्निशमनदलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना टाळे ठोकण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
न्यायालयाच्या निर्देशानुसार ३ मे रोजी रुग्णालयांना ४८ तासांच्या नोटिसा बजावल्या. ६ मेला ४८ तास पूर्ण झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी १५ रुग्णालयांना सील ठोकले. तसेच ठामपा आरोग्य विभागाने या रुग्णालयांची नोंदणीही रद्द केली. सील ठोकलेल्या रुग्णालयांमध्ये वागळे इस्टेट येथील ५, मुंब्रा-कौसा - ४ आणि बाळकूम तसेच नौपाडा या परिसरातील प्रत्येकी तीन रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती ठामपा अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी दिली.