ठाणे पालिकेत २०८५ पदे रिक्त , एका अधिका-याच्या डोईवर पाच विभागांचा कार्यभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 05:48 AM2017-09-10T05:48:51+5:302017-09-10T05:49:06+5:30
स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरातील महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांची सेवानिवृत्ती होत असल्याने आणि रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक विभागांमध्ये एका अधिका-याकडे पाचपाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे
ठाणे : स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरातील महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांची सेवानिवृत्ती होत असल्याने आणि रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक विभागांमध्ये एका अधिकाºयाकडे पाचपाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. आजघडीला तब्बल २०८५ पदे रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे. जादा कामामुळे अधिकारीही मेटाकुटीला आले आहेत.
ठाणे शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे पालिकेचा पसारा वाढला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जात आहेत. परंतु, या योजनांची पूर्तता करण्यासाठी अधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनादेखील कामासाठी हेलपाटे घालावे लागत आहेत. काही अधिकाºयांकडे उपअभियंते, कार्यकारी अभियंते, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यावर पाचपाच विभागांचा कार्यभार आहे. काहींना तर प्रभारी कार्यभारही सोपवला आहे.
त्यातही सध्या दरमहिन्याला निवृत्त होणाºया अधिकारी, कर्मचाºयांची संख्या १५ ते २० च्या घरात असून हे असेच सुरू राहिले तर २०२० पर्यंत पालिकेतील अर्ध्याहून अधिक पदे रिक्त असतील. काही पदे भरण्यासाठी पालिकेने २०११ मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आहे त्याच कर्मचारी, अधिकाºयांच्या बळावर कामे करावी लागत आहेत. तसेच काही ठिकाणी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून घेतले जात आहेत.
पालिकेत मागील सात वर्षांत कर्मचारी, अधिकाºयांची २ हजार ८५ पदे रिक्त झाली. शिवाय अनेक अधिकारी, कर्मचाºयांची पदोन्नतीदेखील थांबली आहे. कर्मचारी, अधिकाºयांच्या भरती आणि प्रमोशनची नियमावली व प्रस्ताव मंजूर असला, तरी शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे त्याची अंमलबजावणी पालिकेला करता आलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांसह सहायक आयुक्त, उपायुक्त आदींसह इतर प्रमुख पदे रिक्त आहेत.
महापालिकेतील कर्मचारी संघटनेने वारंवार ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही आर्थिक अडचणी आणि ढिसाळ कारभारामुळे निर्णय झालेला नाही.
व्यवस्थाच होतेय खिळखिळी
महापालिकेच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी विभागीय पदोन्नती, तर काही ठिकाणी नवीन पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांनादेखील यामुळे पालिकेने बगल दिल्याचे बोलले जात आहे. त्यातही शासनाच्या २०११ च्या नियमानुसार एखाद्या अधिकाºयाचा अतिरिक्त कार्यभार दोन वर्षांपेक्षा अधिक काळ दिला असेल, तर त्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. परंतु, त्यालादेखील तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे. एकूणच टप्प्याटप्प्याने सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांमुळे पालिका येत्या काळात खिळखिळी होणार आहे.