Thane: उल्हासनगरातील रस्त्यासाठी ३०० कोटी? एमएमआरडीएच्या बैठकीत झाला निर्णय
By सदानंद नाईक | Published: November 23, 2023 06:01 PM2023-11-23T18:01:20+5:302023-11-23T18:01:59+5:30
Ulhasnagar News: एमएमआरडीच्या गुरवारी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील विविध रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ३०० कोटीच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - एमएमआरडीच्या गुरवारी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील विविध रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ३०० कोटीच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे. यामुळे शहरातील रस्ते चकाचक होणार असून बुधवारी कोट्यवधीच्या निधीतील विविध विकास कामाचे उदघाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.
एमएमआरडीएच्या गुरवारी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील प्रमुख रस्ते सीसी करण्यासाठी ३०० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर यांनी केली. याव्यतिरिक्त ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गे कॅम्प नं-५ पर्यंत विस्तार करण्याला मान्यता मिळाली असून या बाबत त्वरित कन्सल्टंट नेमावा, कल्याण अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल बाधण्यासाठीच्या प्रस्तावास मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देणे, शहाड ब्रीजला समांतर विठ्ठलवाडी स्टेशन पर्यंत नवीन ब्रीज बनविणे, उल्हासनगर स्टेशन याठिकाणी सॅटिस प्रकल्प उभारणे, महानगरपालिकेची नवीन इमारत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करणे आदी विविध मागण्या बैठकीत करण्यात आल्या आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
एमएमआरडीएच्या विशेष बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त डॉ संजय मुखर्जी, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली आयुक्त इंदुरानी जाखड, उल्हासनगर आयुक्त अजीज शेख, भाजपचे जमनू पुरुस्वनी, शिवसेनेचे गोपाळ लांडगे, अरुण अशान एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अर्जुन कोरगांवकर, महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे, शहर अभियंता संदिप जाधव आदीजन उपस्थित होते. लवकरच शहरातील विविध रस्त्याच्या कामासाठी ३०० कोटी रुपयाचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकारांना दिली आहे.