ठाणे @ ४३.३ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:38 AM2021-03-28T04:38:33+5:302021-03-28T04:38:33+5:30
ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना ठाण्याच्या तापमानातही कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. शनिवारी ठाण्याचे तापमान ...
ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना ठाण्याच्या तापमानातही कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. शनिवारी ठाण्याचे तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहाेचल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठाणेकरांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत होत्या.
यंदा ठाणे शहराच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच शहरातील तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे होता. मार्चमध्ये सातव्यांदा शहरात तापमान ४० अंशांच्या वर होते. उरलेल्या दिवसांतही तापमान ३९ अंशांच्या आसपासच दिसून आले आहे. चालू आठवड्यात २४ आणि २५ मार्चला ठाण्यात ४० अंशांच्या वर तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी २६ मार्चला दुपारी ठाणे शहरात ४२ अंश तापमानाची नोंद झाली, तर शनिवारीही दुपारी ठाण्याचे तापमान ४३.३ अंशांवर गेले हाेते. त्यामुळे सलग चार दिवस ठाण्याच्या तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेल्याचे दिसून आले, तर शुक्रवारी दिवसभरातील सर्वात कमी तापमानाची नोंद सकाळी साडेसात वाजता २५ अंश सेल्सिअस इतकी झाली; पण दुपारच्या तापमानात सतत वाढ होताना दिसत आहे.
थंड पेयाकडे कल
काेराेनामुळे ठाणेकर चिंतेत असताना वाढत्या उन्हाच्या झळांमुळे पुरते हैराण झाल्याचे दिसून येत आहे. काेराेना काळात गरम पाणी प्या, असा सल्ला दिला जात असला तरी नागरिकांचा थंड पेय पिण्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे लिंबू सरबताच्या गाड्यांवर गर्दी हाेताना दिसत आहे.
-------------