ठाण्यात ४,७०५ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:54 AM2018-04-28T02:54:17+5:302018-04-28T02:54:17+5:30
९५ इमारती अतिधोकादायक : धोकादायक इमारतींची संख्या एक हजारांनी वाढली
ठाणे : ठाणे महापालिकेने अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. त्यानुसार, मागील वर्षी अतिधोकादायक ६९ इमारतींपैकी ५४ इमारती रिकाम्या करूनही यावर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ९५ च्या घरात गेली आहे. सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि कामगार वसाहतीमधील धोकादायक इमारतींमुळे ही संख्या वाढल्याचे अतिक्रमण विभागाचे म्हणणे आहे. दुसरीकडे धोकादायक इमारतींच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी एक हजारांनी वाढ झाली आहे. शहरात सध्या चार हजार ७०५ इमारती धोकादायक असून, त्यात नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात इमारती रिकाम्या करून त्यातील काही तोडल्याही होत्या. त्यामुळे यावर्षी त्यांची संख्या काही अंशी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी सिंधी कॉलनी, म्हाडा कॉलनी तसेच कामगार वसाहतीमधील इमारतींचा समावेश धोकादायकच्या यादीत केला आहे. प्रभाग समितीनिहाय केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात चार हजार ७०५ धोकादायक इमारती आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या तीन हजार ६९३ इतकी होती. त्यामुळे यावर्षी ही संख्या एक हजारांनी वाढली आहे. सी-१ आणि सी-२ ए श्रेणीमधील इमारती या अतिधोकादायक असल्याने त्या तत्काळ रिकाम्या करणे आवश्यक आहे. सी-२ ए इमारतींची संख्या यावर्षी ११४ असून गेल्यावर्षी ती ९१ इतकी होती. गेल्या वर्षी ५४ इमारती रिकाम्या करूनही यावर्षी ही संख्या ९५ वर गेली आहे. यावर्षी सी-२ बी श्रेणीमधील इमारतींची संख्या ही २२६० इतकी असून सी-३ श्रेणीमधील इमारतींची संख्या २२३६ इतकी झाली आहे.
नौपाड्यात सर्वाधिक अतिधोकादायक इमारती
जुने ठाणे अशी ओळख असलेल्या नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत सर्वाधिक अतिधोकादायक इमारतींची संख्या आहे. कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती एकत्रित केली असली, तरी कोपरीमध्ये अशा इमारतींची संख्या फार कमी आहे. त्यामुळे या सर्व इमारती नौपाड्यामधील आहेत. गेल्या वर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या ५३ होती. ती यावर्षी ६१ वर गेली आहे. नऊ मीटरपेक्षा रु ंद रस्ते नसल्याने या सर्व इमारतींचा पुनर्विकासदेखील रखडला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीमधील अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ झाली आहे.
धोकादायक इमारतींच्या श्रेणी
सी १ - या श्रेणीमधील इमारती या अतिधोकादायक असून या इमारती रिकाम्या करून निष्कासित केल्या जातात.
सी २ - या श्रेणीतील इमारती या रिकाम्या करून दुरु स्त करता येतात.
सी २ बी - या श्रेणीमधील इमारतींमध्ये रहिवासी राहत असले तरी त्या दुरु स्त करता येऊ शकतात.
सी ३ - या श्रेणीमधील इमारती या किरकोळ दुरु स्तीच्या असल्याने अशा इमारतींवर कारवाई केली जात नाही. मात्र, दुरु स्त करण्याच्या सूचना दिल्या जातात.