ठाण्यात ५० झाडे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:45 AM2018-07-17T02:45:13+5:302018-07-17T02:45:19+5:30
पाचपाखाडी परिसरात प्रशांत धबाले (२६) या तरु णाच्या अंगावर सोमवारी झाड पडून तो गंभीर जखमी झाला.
ठाणे : पाचपाखाडी परिसरात प्रशांत धबाले (२६) या तरु णाच्या अंगावर सोमवारी झाड पडून तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ कौशल्य रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शहरात आता खड्ड्यांपाठोपाठ वृक्षांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
गेल्या वर्षी अंगावर झाड पडून अॅड. किशोर पवार यांचा मृत्यू झाला होता, अशाच प्रकारची घटना असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ठाण्यात खड्ड्यांबरोबरच आता धोकादायक झाडांची समस्यादेखील गंभीर झाली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये झाडे पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. मागील वर्षी मुलीला शाळेत सोडून परत घरी येणाऱ्या अॅड. पवार यांच्या अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. अखेर, त्यांच्या पत्नीला ठाणे महापालिकेत नोकरी दिल्यानंतर हे प्रकरण निवळले होते. साकेत येथे राहणारा प्रशांत काही कामानिमित्त पाचपाखाडी परिसरात आला होता. जनसेवा बँकेजवळून बाइकवरून जात असताना एक मोठे झाड त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या बाइकचेदेखील मोठे नुकसान झाले. त्याला तत्काळ कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शहरात झाडे पाडण्याचे प्रमाण वाढले असून वृक्ष प्राधिकरण मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
>८९ झाडे कोसळली
गेल्या १५ दिवसांत ८९ झाडे पडली आहेत. सोमवारच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये धोकादायक झाडांबाबत भीती निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आवश्यक असताना ठाण्यात आजही ५० धोकादायक झाडे तशीच उभी आहेत. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेच ही माहिती दिली आहे. या विभागाकडे रोजच तशा तक्र ारी येत आहेत.