ठाण्यात १९ ऐवजी ६७ झाडे तोडली; लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या रहिवाशांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:01 AM2020-12-18T00:01:13+5:302020-12-18T00:01:18+5:30

आर्किटेक्ट म्हणतो २६ झाडे छाटली

In Thane, 67 trees were cut down instead of 19 | ठाण्यात १९ ऐवजी ६७ झाडे तोडली; लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या रहिवाशांची तक्रार

ठाण्यात १९ ऐवजी ६७ झाडे तोडली; लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या रहिवाशांची तक्रार

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीच्या मागील प्लॉटवरील १९ झाडे तोडण्यास परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात ६७ झाडे तोडली असल्याने त्याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी या सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे. गुरुवारी येथील रहिवाशांनी आयुक्तांना निवेदन दिले व वृक्षतोड करताना ५० वर्षे जुने झाड तोडल्याचा आरोप केला.
मनपाने एका खासगी शाळेसाठी लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीमागील प्लॉट विकण्याआधी तेथे हिरवीगार झाडी होती. ज्या शहरात मोकळ्या जागेची तीव्र कमतरता आहे, अशा शहरात आपण वृक्षतोड करण्यास परवानग्या देता कशा, याबद्दल नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. आज, हा प्लॉट झाडे तोडल्याने मोकळा झाला आहे, असे रहिवाशांनी निवेदनात म्हटले आहे.  वृक्षतोड होत असल्याचे लक्षात आले तेव्हा रहिवासी मंजुषा पवार यांनी पालिकेला झाडे तोडण्यास विरोध केला. मात्र मनपाने दिलेल्या परवानगीचे पत्र त्यांनी वाचले. त्यात परवानगी दिली त्यापेक्षा अधिक झाडे तोडली आहेत, असे त्यांच्या लक्षात आले.  संबंधित अधिकाऱ्यांना ही झाडे तोडू नका, अशा वारंवार विनवण्या केल्या, पण त्यांनी माझे ऐकले नाही. तसेच, या झाडांचे पुनर्रोपण कुठे केले जाणार यासंदर्भात स्पष्टता नसल्याचे पवार म्हणाल्या. 
मनपाच्या परवानगीनुसार, १९ झाडे तोडायची व ४९ झाडांचे पुनर्रोपण करावे लागेल, पण छाटलेले वृक्ष व असलेले वृक्ष यांचा मेळ जुळत नाही. प्लॉटवरील ९१ झाडांपैकी सध्या फक्त २४ झाडे उरली आहेत. म्हणजे ६७ वृक्ष छाटले. मात्र आर्किटेक्ट आपण २६ झाडे तोडल्याचे सांगत आहे. म्हणजे परवानगी दिलेल्या १९ झाडांपेक्षा जास्त झाडे कापली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

त्या प्लॉटवर वृक्षतोड नियमानुसार केली जात आहे. आज त्यांनी लेखी कळविले असल्याने वृक्षतोडीचे काम थांबविले आहे. लक्ष्मी नारायण सोसायटीच्या रहिवाशांच्या शंकांचे निरसन झाल्यावरच पुढील कामास सुरुवात केली जाईल.
    - अलका खैरे, 
       वृक्ष प्राधिकरण अधिकारी, ठामपा

Web Title: In Thane, 67 trees were cut down instead of 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.