ठाण्यात १२ दिवसांत ७८ कंटेनमेंट वाढले; प्रशासनासमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:35 AM2020-05-27T01:35:35+5:302020-05-27T01:35:51+5:30
९७ इमारती आणि उर्वरित झोपडपट्टी, चाळींच्या परिसराचा समावेश होता.
ठाणे : गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी जाहीर केली असून यामध्ये तब्बल २३५ झोनचा समावेश आहे. १२ दिवसांपूर्वी हाच आकडा १६१ वर होता. ज्या प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये कंटेनमेंट झोनची वाढ झाली आहे, यात सर्वात आघाडीवर मुंब्रा असून यानंतर लोकमान्यनगर, नौपाडा-कोपरी आणि वागळे प्रभाग समितीचा समावेश केला असून हे सर्व झोपडपट्टीचा भाग असल्याने या भागात कंटेनमेंटच्या नियमांच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या २८ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत गुणाकार पद्धतीने वाढ होत आहे. शहरात टेस्ट करण्याचे प्रमाण वाढले असल्याचा दावा प्रशासनाने केला तरी ठाण्यासाठी ही चिंतेची बाब आहे. वागळे इस्टेट आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती रुग्ण संख्येत आघाडीवर आहे. या भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ११३ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केली होती. त्यामध्ये ९७ इमारती आणि उर्वरित झोपडपट्टी, चाळींच्या परिसराचा समावेश होता.
मात्र, या संख्येत वाढ झाली असून शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांचा आकडा १६१ इतका झाला होता. यामध्ये मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रात प्रत्येकी २६, सावरकर-लोकमान्यनगर प्रभाग समितीत २१, वागळे इस्टेट प्रभाग समितीत २०, नौपाडा प्रभाग समितीत १७ प्रतिबंधित क्षेत्रे असून हे सर्वच परिसर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीत आघाडीवर होते.
रणजीत कुमार यांची कसोटी
गेल्या १२ दिवसांमध्ये मात्र या कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली असून यामध्ये मुंब्रा सर्वात आघाडीवर आहे. वारंवार घराबाहेर पडू नका, असे आवाहन करूनही मुंब्य्रातील नागरिक ऐकत नसल्याने या ठिकणी रुग्णसंख्यादेखील वाढत असून कंटेनमेंट झोनमध्येदेखील वाढ होत आहे. मुंब्य्रानंतर नौपाडा-कोपरी, लोकमान्यनगर, माजिवडा, वागळे अशा प्रभाग समित्यांमधील झोनचा समावेश केला आहे. त्यामुळे आता नवीन आलेल्या रणजीत कुमार या आयएएस अधिकाऱ्यांवर कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आहे.
प्रभाग समितीनिहाय झोनची संख्या
उथळसर-२१, माजिवडा-२७, वर्तकनगर-१३, लोकमान्यनगर-३३, वागळे-२५, नौपाडा-कोपरी- ३५, कळवा-२६ मुंब्रा-३९, दिवा- १६ असे एकूण २३५ कंटेनमेंट झोन आहेत.