Thane: ठाणे शहरात ८८ वृक्ष उन्मळून पडली, वृक्ष प्राधिकरण विभागाला आली उशिराने जाग
By अजित मांडके | Updated: May 14, 2024 18:49 IST2024-05-14T18:42:27+5:302024-05-14T18:49:30+5:30
Thane News: ठाण्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने शहरातील विविध भागात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी मात्र वाहनांचे आणि घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे.

Thane: ठाणे शहरात ८८ वृक्ष उन्मळून पडली, वृक्ष प्राधिकरण विभागाला आली उशिराने जाग
- अजित मांडके
ठाणे - ठाण्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने शहरातील विविध भागात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी मात्र वाहनांचे आणि घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. परंतु एवढ्याशा पावसाने वृक्ष पडल्याने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातही धोकादायक स्थितीत शहरात किती वृक्ष आहेत, याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नाही. सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर आता या विभागाकडून धोकादायक वृक्षांचा सर्व्हे हाती घेण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात महापालिका हद्दीत वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. दरवर्षी हा आकडा वाढतांना दिसत आहे. परंतु त्यावर उपाय योजना करण्यात महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. २०२०-२१ या वर्षात एकूण ६२८ झाडे उन्मळून पडली होती. त्यानंतर दरवर्षी हा आकडा वाढतांंनाच दिसून आला आहे. मागील काही वर्षात शहरातील झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र वृक्ष का पडत आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला वेळ नाही. यामागे शहरातील वाढलेले काँक्रीटीकरण देखील वृक्षांच्या मुळावर येत असल्याचा दावा तज्ञांनी केली आहे. काही झाडे आतून पोखरली देखील जात असल्याने ती कधीही उन्मळून पडत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला, गटारांच्या बाजूला अशा पध्दतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपणांमुळे देखील वृक्ष पडण्याच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. त्यातही देशी प्रजातीच्या वृक्षांऐवजी विदेशी प्रजातीच्या वृक्षांना महत्व दिले जात असल्याने देखील हे प्रमाण वाढतांना दिसत आहे.
त्यानुसार मागील वर्षी मोठ्या आकाराचे वृक्ष पडण्यामागे काय कारणे आहेत, शहरात अशा प्रकारचे वृक्ष किती आहे, याचा सर्व्हे जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करुन केला जाणार होता. त्यासाठी तज्ञाची नेमणुक देखील करण्यात आली होती. परंतु त्याचे पुढे काहीच झाले नसल्याचे आता दिसत आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या वादळी वाºयाच्या पावसात ६१ वृक्ष उन्मळून पडले होते. तर मंगळवारी पाऊस थांबल्यानंतरही दिवसभरात २७ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले आहे. आता काही दिवसात पावसाळा सुरु होणार आहे. परंतु असे असतांना आता कुठे वृक्षांच्या फांद्या छाटणीची मोहीम वृक्ष प्राधिकरण विभागाने हाती घेतली आहे. त्यातही वृक्ष पडल्याच्या घटनेनंतर आता शहरात किती धोकादायक वृक्ष आहेत, याचा सर्व्हे वृक्ष प्राधिकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यामुळे पडण्याच्या अवस्थेत असलेले वृक्ष किती याचा अंदाज वृक्ष प्राधिकरणाला बांधता आलेला नाही.