कोकणासाठी ठाण्यातून ९२० बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:40 AM2018-08-21T03:40:52+5:302018-08-21T03:42:39+5:30
गणेशोत्सवासाठी ६८४ गाड्या बुक; ग्रुप बुकिंगकडे कल, ११ सप्टेंबरला सुटणार सर्वाधिक गाड्या
- पंकज रोडेकर
ठाणे : गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी जणू एक पर्वणीच असते. कोकणात बाप्पांच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ९२० एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी जवळपास ६८४ बसेस आजघडीला हाउसफुल्ल झाल्या आहेत. तर, सर्वाधिक बसेस ठाण्याच्या खोपट डेपोतून सोडल्या जाणार आहेत. ज्या चार डेपोंतून बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे, त्यामध्ये सध्यातरी ११ सप्टेंबरला सर्वाधिक ४३५ बसेस बुक झालेल्या आहेत. व्यक्तिश: बुकिंगपेक्षा ग्रुप बुकिंग करण्याकडे चाकरमान्यांचा कल दिसून येत आहे.
यंदा गणेशचतुर्थी १३ सप्टेंबर रोजी असून त्यानिमित्त कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची तयारी सुरू झाली आहे. कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ठाणे विभागाने यंदा ९२० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास जादा बसेस सोडण्याची तयारी करून ठेवल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे विभागातील चार डेपोंतून ८ ते १२ सप्टेंबरदरम्यान जादा फेºया सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे संगणकीय आरक्षण एक महिना अगोदरपासून उपलब्ध करून दिले आहे.
ग्रुप पद्धतीचे आरक्षण ४० दिवस आधी सुरू झाले असून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. परतीच्या आरक्षणाची व्यवस्थाही तत्काळ उपलब्ध करून दिली असून परतीचा प्रवास हा १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार असल्याची माहिती विभागाने दिली.
दोन दिवस आधी खरी कसरत
११ सप्टेंबर रोजी सध्या ४३५ बसेस बुक आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात विशेष आॅपरेशन एसटी विभागामार्फत राबवले जाते. बसमध्ये जागा बुक केलेल्या चाकरमान्याला त्याच्या बसपर्यंत सहज पोहोचता यावे, हा त्यामागचा उद्देश असतो.
त्यामुळे यादिवशी कर्मचाºयांची प्रचंड धावपळ उडते. गणेशोत्सवाच्या काळात जनरल आणि गणपतीसाठी सोडण्यात येणाºया गाड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. त्यामुळे या गाड्यांशी नियमित गाड्यांचा संबंध येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यादिवशी सर्वाधिक ४३५ बसेस
कोकणात जाण्यासाठी ८ ते १२ सप्टेंबर असे पाच दिवस जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८ सप्टेंबरला शनिवार असून त्यादिवशी अवघ्या तीन जादा बसेस सुटणार आहेत. ९ सप्टेंबरला २४, १० रोजी ११३, १२ सप्टेंबर रोजी १०९, तर ११ सप्टेंबर रोजी सर्वाधिक ४३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.
ग्रुपद्वारे ३१४ बसेस फुल्ल : चाकरमान्यांचा ग्रुप बुकिंग करण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. ३० जुलैपासून आतापर्यंत ग्रुपने ३१४ बसेस बुकिंग केल्या आहेत. हे बुकिंग करण्यात राजकीय मंडळींचा भरणा अधिक आहे. ग्रुप बुकिंग असल्याने त्यांना एसटी डेपोमध्ये येण्याची गरज नसते. ग्रुपने निश्चित केलेल्या ठिकाणापासून बस थेट गावात नेली जाते.
रत्नागिरीकर आघाडीवर : बाप्पांच्या आगमनासाठी गाड्यांचे सर्वाधिक बुकिंग करणाºयांमध्ये रत्नागिरीकर आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ दापोली, गुहाघर, चिपळूण आणि खेड येथील चाकरमानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गणेशोत्सवात कोकणात जाणाºया प्रवाशांची संख्या ठाणे आणि मुंबईतून जास्त आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा जवळपास १०० बसेस जास्त सोडण्याचे नियोजन के ले आहे. शेवटच्या दिवसात कोकणात जाण्यासाठी गर्दी वाढल्यास आणखी बसेस सोडण्याचीही तयारी आहे. गणेशोत्सवात गावी जाणाºयांना त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.
- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे परिवहन विभाग
ग्रुप बुकिंगला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसेसमध्ये आणखी चार किंवा पाच जणांना घेऊन जायची वेळ आली, तर त्यांना स्वतंत्र तिकीट घ्यावे लागेल. व्यक्तिगत बुकिंगच्या बसेस जवळपास फुल्ल होत आल्या आहेत.
- आर.एच. बांदल, वाहतूक अधिकारी, ठाणे परिवहन विभाग