Thane: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पडले झाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:24 PM2022-07-05T15:24:45+5:302022-07-05T15:25:26+5:30
ThaneNews: मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी या निवास्थाबाहेर सव्र्हीस रोडजवळ वृक्ष पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
ठाणे - मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी या निवास्थाबाहेर सव्र्हीस रोडजवळ वृक्ष पडल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देण्यासाठी महापालिकेचे जवळ जवळ सर्वच अधिकारी बंगल्यावर गेले असतांना घटनेची माहिती मिळताच येथील वृक्ष हटविण्यात येऊन वाहतुक सुरळीत करण्यात आली. यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या गाडीवर हे झाड पडल्याचे दिसून आले.
मंगळवारी दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी सव्र्हीस रोडच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे खोदकामही करण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील वृक्षाची मुळे देखील बाहेर आली होती. त्यात सोमवारी पासून सुरु असलेल्या पावसामुळे वृक्षाच्या आजूबाजूची जमीन देखील भुसभुशीत झाली होती. त्यामुळेच हे वृक्ष पडले असावे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान हे वृक्ष बाजूला असलेल्या विद्युत पोलवर पडल्याने पोल देखील खाली वाकला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. परंतु हे वृक्ष महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या गाडीवर काही प्रमाणात पडल्याचे दिसून आले. परंतु पोल मध्ये असल्याने गाडीचे फारसे नुकसान झाले नाही.
विशेष म्हणजे शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर सोमवारी रात्री ते प्रथमच ठाण्यात आले आहेत. मंगळवारी ते आपल्या निवास्थानी होते. यावेळी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. त्याच वेळेस ही घटना घडली आहे. घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने हे वृक्ष बाजूला काढले आहे. वृक्ष हटविण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा कालावधी गेल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.