ठाणे : वाळू असलेला ट्रक उलटला, दोन तास सर्व्हिस रोड झाला बंद
By अजित मांडके | Published: March 9, 2024 03:38 PM2024-03-09T15:38:56+5:302024-03-09T15:40:11+5:30
या अपघातामुळे तब्बल २-तासांहून अधिक काळ त्या रस्त्यावरील वाहतूक बंद होती.
ठाणे : अंदाजे ४ ते ५ ब्रास वाळू असलेला ट्रक उलटल्याची घटना शनिवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल सर्व्हिस रोडवर समोर आली. या अपघातामुळे तब्बल २-तासांहून अधिक काळ त्या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तर सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
कमलाकर डाकी यांच्या मालकीचा ट्रक मध्ये अंदाजे ४ ते ५ ब्रास वाळू घेऊन त्यावरील चालक सतिश वल्लेपवाड हा पडघा मार्गे घोडबंदर रोडवरील हिरानंदानी येथे जात होता. शनिवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल सर्व्हिस रोडने जाताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून सर्व्हिस रोडमधील डिव्हायडरला जाऊन ट्रक धडकला आणि उलटला. या अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे समोर आले.
तसेच अपघातग्रस्त ट्रक ०२-हायड्रा मशिनच्या साहाय्याने रोडच्या एका बाजूला करण्यात आला. तर वाळूचा ट्रक उलटल्यामुळे सर्व्हिस रोड वरती पडलेली वाळू जे.सी.बी. मशीनच्या मदतीने बाजूला करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी रोडवरती सांडलेल्या ऑईलवरती माती पसरवली. तर या घटनेने विवियाना मॉल सर्व्हिस रोड २ तासांहून अधिक काळ वाहतुकीसाठी बंद राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.