Thane: आर मॉल फूटब्रिजवर तरुणीला ठार मारण्याची धमकी देत मोबाईल हिसकावला
By जितेंद्र कालेकर | Published: November 21, 2023 07:37 PM2023-11-21T19:37:45+5:302023-11-21T19:38:22+5:30
Crime News: पोखरण रोड क्रमांक दोन येथील सिंघानिया शाळेसमोर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन फूटब्रिजचे उद्घाटन करण्यात आले.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - पोखरण रोड क्रमांक दोन येथील सिंघानिया शाळेसमोर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन फूटब्रिजचे उद्घाटन करण्यात आले. रविवारीच ठाण्यातील घोडबंदर रोड येथील आर मॉलजवळील पादचारी पुलावरून रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीचा मोबाईल खेचून तिला धमकावल्याचा प्रकार समोर आला. नागरिकांच्या मदतीने यातील आरोपी आतिश धिवार याला चितळसर पोलिसांनी अटक केली.
वर्षभरापूर्वी याच पुलावर एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगाचाही प्रकार घडला होता. त्यामुळे अशा पूलांवरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दिवा येथील ही २६ वर्षीय तरुणी घोडबंदर राेड येथील मानपाडा परिसरात काम करते. महिनाभरापूर्वी तिने हा २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल खरेदी केला होता. ती कामानिमित्त मानपाडा येथे १९ नोव्हेंबर रोजी आली होती. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ती घरी जातांना रस्ता ओलांडण्यासाठी आर मॉल येथील फूट ब्रिजवर आली. त्याचवेळी तिच्या पाठीमागून एक तरुण आला. त्याने या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तिलाही त्याने ढकलले. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली. त्याच दरम्यान तिने आरडाओरडा केला. त्यानंतर विनायक कुडेकर, राहुल राठोड आणि आनंद गुप्ता या दक्ष नागरिकांनी चोरट्याला पकडले. त्याला चितळसर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर चौकशीत आतिश धिवार असे त्याचे नाव समोर आले. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले. या पादचारी पुलावर ऑगस्ट २०२२ मध्ये एका १७ वर्षीय मुलीचाही विनयभंग झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. अशा घटनांमुळे फूटब्रिजवरही पोलिसांनी आपली गस्त ठेवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.