Thane: राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान
By अजित मांडके | Published: July 9, 2024 08:46 PM2024-07-09T20:46:10+5:302024-07-09T20:46:47+5:30
Thane News: मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वनखात्याच्या १५० एकर जमिनीवर हे प्रकल्प आकार घेणार आहेत. मं
- अजित मांडके
ठाणे - मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वनखात्याच्या १५० एकर जमिनीवर हे प्रकल्प आकार घेणार आहेत. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली असता त्यास मान्यता देऊन वनखात्याच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकार्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मंगळवारी विधान भवन मध्ये शिंदे यांच्या उपस्थितीत ही मीटिंग झाली. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजुबाजूच्या शहरामध्ये इमारतीचे बांधकाम वाढत चालले आहे. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अश्या प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील अबाल वृध्दांना या उद्यानाचा फायदा होईल.
त्यानुसार या १५० एकर जागेवर बाबूंच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी सुध्दा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. वनखात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढे बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे असाही अभिप्राय वनखात्याच्या अधिकार्यांनी दिला.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खार्गे, अतिरिक्त प्रधान सचिव आय.एस. चहल, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.