ठाणे पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:37 AM2021-03-28T04:37:54+5:302021-03-28T04:37:54+5:30
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत सध्या दिवसाला ८०० ते ९०० रुग्ण सापडू लागल्याने ठाणे शहर पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल ...
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत सध्या दिवसाला ८०० ते ९०० रुग्ण सापडू लागल्याने ठाणे शहर पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे दिसत आहे. त्यानुसार, ठाणे महापालिकेने पुन्हा कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिका मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयांत नागरिकांना येण्यास मज्जाव केला आहे.
ठाणेकरांना नियम पाळण्याचे आवाहन करूनही त्यांचे पालन होताना दिसत नाही. स्टेशन परिसरातील मार्केट, रिक्षांमध्ये, बसमध्ये आजही गर्दी असल्याचे दिसत आहे. नागरिक नियम पाळतच नसल्याने महापालिकेने आता एकेक पाऊल लॉकडाऊनच्या दिशेने टाकण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मार्चच्या पहिल्या तारखेपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत एकूण ६२ हजार ३४० रुग्ण कोरोनाचे झाले होते. तर, १ मार्चपासून २६ मार्चपर्यंत शहरात तब्बल १० हजार ५९२ कोरोनाचे नवे रुग्ण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे निश्चितच ही बाब ठाणेकरांच्या दृष्टीने चिंतेची आहे. फेब्रुवारीअखेर प्रत्यक्ष उपचार घेणारांची संख्या एक हजार ७४३ होती. त्यात २६ दिवसांत पाच हजार तीन रुग्णांची वाढ होऊन सध्या सहा हजार ७४६ रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर, याच कालावधीत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता ठाणे महापालिकेने काही निर्बंध कडक करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार, प्रत्येक सोसायटीलादेखील निर्बंध घालण्याचे सांगितले आहे. यामध्ये एखाद्या इमारतीत रुग्ण आढळल्यास त्याच्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. तसेच त्याच्या घरावरदेखील स्टिकर लावण्यात येत आहे. याशिवाय, त्याच्या घरातल्यांनीदेखील १४ दिवस घरातच विलगीकरणात राहावे, असेही स्पष्ट केले आहे. तसेच खाजगी कार्यालयांमध्येही ५० टक्के उपस्थितीत काम करून घ्यावे, अशा सूचनाही केल्या आहेत. मास्कशिवाय कोणालाही कार्यालयात अथवा सोसायटीत प्रवेश देऊ नये. सॅनिटायझरचा वापर करावा, तापमान मोजण्यात यावे, मॉलच्या ठिकाणी प्रवेश देतानाही आता प्रत्येकाची ॲण्टीजेन टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे सोसायटीच्या ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन निश्चित केले आहेत. याशिवाय, महापालिका मुख्यालयासह प्रभाग समिती कार्यालयात अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कामाच्या ठिकाणी ५० टक्के उपस्थिती असावी. ५५ वर्षांवरील व्यक्तींना आलटूनपालटून कामावर येण्याची मुभा देण्यात आली आहे. पालिकेने पहिल्यासारखेच टप्प्याटप्प्याने नियम कठोर करण्यास सुरुवात केली आहे. तरीही, ठाणेकर नागरिक आजही या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. शेअर रिक्षांमधून चार ते पाच प्रवासी कोंबून घेतले जात आहेत. त्यातही रिक्षाचालकांच्या तोंडाला मास्क असून नसल्यासारखे दिसत आहेत. स्टेशन परिसरातील जांभळीनाक्यापासून असलेल्या मार्केटमध्ये सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. याशिवाय, बसमध्येदेखील एक सीट सोडून बसण्याचे सांगूनही बसून आणि उभे राहून गर्दीतून प्रवास सुरू आहे. यामुळेच ठाण्याची आता पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे दिसू लागले आहे.