ठाण्यात पाचही तालुक्यांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, १८४ ग्रामपंचायतींत कोरोनाचा शिरकावच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:39 AM2021-01-18T07:39:19+5:302021-01-18T07:40:27+5:30
ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सुरेश लाेखंडे -
ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या तालुक्यांतील गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. आता दिवसाकाठी बोटांवर मोजण्याइतके बाधित आढळून येत आहेत, तर मृतांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटत असून, काही दिवसांच्या अंतराने एखाद्दुसरे मृत्यू होत आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य अधिकारी मनीष रेंघे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अर्चना देशमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली २८ हजार ७४७ कोरोना चाचण्या केलेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९५.५९ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.
गावांपेक्षा शहरांमध्ये रुग्ण अधिक -
जिल्ह्यात सद्यस्थितीपर्यंत दोन लाख ४८ हजार ८०९ रुग्ण बाधित झाल्याची नोंद आहे. यातील सर्वाधिक शहरांमध्ये दोन लाख २९ हजार ८३१ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यातील शहरी भागात पाच हजार ४६४ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर गावपाड्यांमध्ये केवळ ५८३ जण दगावलेले आहेत. या रुग्णसंख्येपैकी गावपाड्यांमधील १८ हजार ९४ रुग्ण या कोरोनाच्या महामारीतून वाचवण्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना यश आले आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या १० लाख ७५ हजार ५९५ जणांपैकी तपासणीअंति आठ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक निगेटिव्ह आले.