Thane: आनंद हरपला नाही ‘परतला’; पण कुणासाठी?

By अजित मांडके | Published: August 29, 2022 09:48 AM2022-08-29T09:48:29+5:302022-08-29T09:49:26+5:30

Thane: ‘शिवसेना’ या चार शब्दांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या दिघे यांच्यासाठी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे.

Thane: Anand not lost 'back'; But for whom? | Thane: आनंद हरपला नाही ‘परतला’; पण कुणासाठी?

Thane: आनंद हरपला नाही ‘परतला’; पण कुणासाठी?

Next

- अजित मांडके   
सध्या ठाण्यासह जिल्ह्यात एकच धून वाजत आहे. ‘माझा आनंद हरपला... माझा आनंद हरपला...’, मात्र खरंच आनंद हरपला की आनंद परतला, याची चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. मागील काही दिवसांत राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींनतर ठाण्यात आनंद दिघे या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ‘शिवसेना’ या चार शब्दांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत जगलेल्या दिघे यांच्यासाठी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. त्यामुळे ‘आनंद हरपला नाही, तर परतला’ असेच काहीसे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, आनंद कोणाचा शिंदेंचा की ठाकरेंचा हा वाद इतक्या लवकर मिटणारा नाही. शिवसैनिक या वादामुळे दु:खी आहे. खरंच आनंद ठाण्यात परतला तर आपल्यावरून सुरू असलेला संघर्ष पाहून गुदमरून जाईल, अशी भावना निष्ठावान शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

ठाण्याला किंबहुना जिल्ह्यातील प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत शिवसेना पोहोचविण्याचे काम शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ’  अशी ओळख असलेल्या आनंद दिघे यांनी केले. काही वर्षांपूर्वी काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचे निधन झाले. ठाण्यातील शिवसेना पोरकी झाली. असे असले तरी आजही प्रत्येक निवडणुकीत दिघेंच्या आठवणी जागविल्या जातात. त्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागण्याचे काम मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्यानेच दिली. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मागील दीड महिन्यांची परिस्थिती पाहिल्यास शिवसेनेचेच दोन तुकडे झाले असून, खरी शिवसेना कोणाची, यावरून संघर्ष सुरू आहे. शिंदे गटाकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जात आहे. तसाच दावा ठाकरे हेही करत आहेत. बाळासाहेबांचे विचार आणि दिघेंची शिकवण घेऊन आम्ही हिंदुत्वाचा नारा देत असल्याचे सांगितले जाते. 

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर त्याचे ठाण्यात पडसाद उमटले. ठाण्यातील शिवसेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले, अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकेत दिसून आली. शिंदे गट जिल्ह्यात वरचढ ठरू पाहत आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी दोन गटांत चढाओढ सुरू आहे. शिंदे गटाकडून दिघे कार्ड बाहेर काढण्यात आले आहे. दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित केला गेला. जिल्ह्यात चित्रपट पोहोचविण्याचे काम  करण्यात आले. गुरुपौर्णिमा उत्सवात, १५ ऑगस्ट रोजी, दहीहंडी उत्सवात आणि शुक्रवारी दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून दिघे हेच आमचे गुरु असल्याचा दावा करण्यात आला. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, ही दिघे यांची इच्छा आम्ही पूर्ण केल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात दिघे कार्ड चालवून मतांचा जोगवा मागण्याचाच प्रयत्न केला जाणार हे स्पष्ट दिसते.

दिघेंचे स्वप्न काय होते?
दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दिघे काय होते, कसे होते, त्यांची इच्छा काय होती, स्वप्न काय होते, हे शिवसैनिकांच्या व मतदारांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जात आहे. 
आमचा आनंद हरपला म्हणता म्हणता आमचा आनंद पुन्हा परतला असल्याचेच दाखविण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होत आहे. 
मात्र, आनंद निवडणुकीत कुणाला खराखुरा विजयाचा आनंद मिळवून देणार ते महत्त्वाचे आहे.  

Web Title: Thane: Anand not lost 'back'; But for whom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.