चार बांग्लादेशी महिलांना ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:02 PM2018-03-30T19:02:03+5:302018-03-30T19:02:03+5:30
अवैध मार्गाने भारतात घुसखोरी करून भिवंडी येथे वास्तव्य करणाऱ्या चार बांग्लादेशी महिलांना ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रात्री भिवंडी येथून अटक केली.
ठाणे : बांग्लादेशातून घुसखोरी करून भिवंडीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार महिलांना ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. भिवंडी येथे गुरूवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
बांग्लोदशी घुसखोर महिलांची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना गुरूवारी मिळाली. त्यानुसार रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांच्यासमवेत सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हांडके, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले आणि महिला कर्मचाऱ्याच्या पथकाने भिवंडी येथील कन्हेरी रोडवरील हनुमान टेकडी परिसरात छापा टाकला. यावेळी रूमा फारूख शेख, रूकीम जलाल शेख, नजमा कबीर शेख आणि रत्ना हनीफ शेख यांना पोलिसांनी अटक केली. नजमा कबीर शेख ही जवळपास आठ वर्षांपासून भारतात अवैधरित्या वास्तव्य करून आहे. उर्वरित तीन महिलांनी साधारणत: ६ ते ८ महिन्यांपूर्वी घुसखोरी केली. तीन महिला मुळच्या बांग्लादेशातील नरसिंबी जिल्ह्याच्या तर एक महिला गाजीपूर जिल्ह्याची आहे. चारही महिला या भागात वेश्या व्यवसाय करीत होत्या. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याजवळ भारतातील वास्तव्याबाबत एकही अधिकृत पुरावा आढळला नाही. एवढ्या दिवसांपासून या भागात आरोपी महिलांना ज्यांनी आश्रय दिला, त्यांची चौकशी त्यांच्याविरूद्धही कारवाई केली जाणार असल्याची माहिती रवींद्र दौंडकर यांनी दिली. चारही आरोपींना न्यायालयाने २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.