महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस

By अजित मांडके | Published: September 28, 2024 05:52 AM2024-09-28T05:52:52+5:302024-09-28T05:53:21+5:30

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळाले यश

Thane assembly elections if the dispute between the grand alliance goes to waste it will be hit | महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस

महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस

ठाणे लोकसभा

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या चार मतदारसंघांत चुरशीच्या लढती होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे नरेश म्हस्के चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला. साहजिकच महायुतीमधील शिंदेसेना, भाजप यांचे मनोबल वाढले आहे. महायुतीमधील अंतर्गत वाद विकोपाला गेले तर ठाणे लोकसभेत वेगळे चित्र दिसेल. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिंगणात असल्याने येथील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ शिंदेसेना आणि भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. आ. संजय केळकर यांच्याविरोधात पक्षातील संजय वाघुले, संदीप लेले आणि कृष्णा पाटील यांच्यासह मृणाल पेंडसे यांनी उमेदवारीवर दावा केला. शिंदेसेनेनेही या मतदारसंघावर दावा करीत भाजपला आव्हान दिले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट आणि उद्धवसेना या तीनही पक्षांनी येथे दावा केला आहे. महाआघाडीतील कोणत्या पक्षाला हा मतदारसंघ मिळणार, याची उत्सुकता आहे. मागील वेळेस या मतदारसंघातून लढलेले मनसेचे अविनाश जाधव हे पुन्हा रिंगणात उतरणार असल्याने तिरंगी लढत होणार आहे.

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मनसेचे अभिजित पानसे हे रिंगणात उतरणार असून उद्धवसेना येथून केदार दिघे यांना उमेदवारी देऊन ‘दिघे कार्ड’ खेळण्याच्या तयारीत आहे. उद्धवसेना व मनसेचा उमेदवार रिंगणात असल्याचा लाभ शिंदे यांना होणार की, दिघे कार्ड शिंदे यांचे मताधिक्य रोखणार, असे तर्कवितर्क केले जात आहेत.

भाजपचा सरनाईक यांच्या मतदारसंघावर दावा

ओवळा माजिवडा मतदारसंघ शिंदेसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या ताब्यात आहे. भाजपकडील ठाणे शहर मतदारसंघावर शिंदेसेना दावा करत असल्याने दबावतंत्राचा भाग म्हणून भाजप सरनाईकांच्या मतदारसंघावर दावा करते. 

उद्धवसेना घोडबंदरचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. मनसेकडे येथे प्रभावी उमेदवार तूर्तास दिसत नाही.

महायुतीला मारक ठरण्याची भीती 

मीरा-भाईंदरमधून मागील वेळी अपक्ष गीता जैन विजयी झाल्या. त्या भाजपपुरस्कृत आमदार आहेत. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह शिंदेसेनेचे रवी व्यास यांची नावे चर्चेत आहेत. येथील भाजपमध्ये जैन विरुद्ध मेहता वाद आहे. काँग्रेसचे मुजफ्फर हुसेन हे इच्छुक आहेत. भाजपमधील वाद महायुतीला मारक ठरण्याची भीती आहे.

ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. ऐरोलीमध्ये गणेश नाईक आमदार आहेत. शिंदेसेनेतून विजय चौघुले, काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे, उद्धवसेनेचे द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी यांची नावे आघाडीवर आहेत. चौघुले ऐनवेळी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे विद्यमान आमदार असल्या तरी तेथे भाजपचे संदीप नाईक तिकिटासाठी धडपड करीत आहेत. शिंदेसेनेचे विजय नहाटा हेही इच्छुक आहेत. महायुतीमधील वाद, स्पर्धा डोकेदुखी ठरणार आहे. 

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे चंद्रकात पाटील, मंगेश आमले, काँग्रेसचे अनिल कौशिक, तर उद्धवसेनेचे विठ्ठल मोरे, आदींची नावे महाविकास आघाडीत चर्चेत आहेत. 
 

Web Title: Thane assembly elections if the dispute between the grand alliance goes to waste it will be hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.