महापालिका अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी 'त्या' हल्लेखोरास ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 04:17 PM2021-08-31T16:17:59+5:302021-08-31T16:18:19+5:30
सोमवारी सांयकाळी पिंपळे या त्यांच्या पथकासह कासारवडवली येथील बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.
ठाणे : ठाणे महापालिकेमधील माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक या दोघांवर हल्ला करणाऱ्या अमरजित यादव या हल्लेखोरास ठाणे न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या हल्लेखोरावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी बोलताना दिली.
सोमवारी सांयकाळी पिंपळे या त्यांच्या पथकासह कासारवडवली येथील बाजारपेठेतील अनधिकृत फेरीवाले आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. कारवाई सुरू असताना, यादव याने रागाच्या भरात हाती चाकु घेऊन पिंपळे याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून हाताची बोटे कापली गेली आहेत. तसेच त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेला अंगरक्षक याच्या ही हाताचा बोट कापला गेला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर कासारवडवली पोलिसांनी हल्लेखोर यादव याला अटक केली. तसेच मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयाला केली. त्यानुसार न्यायालयाने यादव याला ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर यादव याच्या यापूर्वी गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात होते. मात्र प्राथमिक तपासात त्याच्यावर एक गुन्हा यापूर्वी दाखल नाही. तसेच त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी दिली.
'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे
हल्लेखोरास मनसे चोपणार
परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत कोणी असं अधिकाऱ्यांवर हल्ला केली नव्हता. आज हल्ला केलाय आणि त्याला पोलिसांनी अटक केली. उद्या तोच जामिनावर सुटेल व पुन्हा हल्ला करायला मोकळा असेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मात्र ज्या दिवशी हल्लाखोर फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याचदिवशी त्याला मनसैनिक चोप देतील. भीती काय असते ते त्याला दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.