ठाणे - अयोध्येचे वेगळेच नाते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : पंतप्रधानांमुळे भक्तांचे राम मंदिर स्वप्न साकारतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:22 AM2023-12-18T09:22:41+5:302023-12-18T09:22:52+5:30
गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती. त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यामुळे जगभरातील भक्तांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. संपूर्ण देशात राम मंदिराबाबत उत्सुकता असून, देश राममय झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून एक चांदीची वीट आनंद दिघे यांनी पाठविली होती. त्यामुळे ठाणे आणि अयोध्येचे वेगळेच नाते आहे, असे ते म्हणाले.
गडकरी रंगायतन ते कौपिनेश्वर मंदिर मार्गादरम्यान श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा रविवारी दुपारी काढली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार, कौपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारीही उपस्थित होते. राम मंदिर बनवणार पण, तारीख सांगणार नाही, असे काही लोक म्हणायचे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी मंदिरही उभारले आणि तारीखही सांगितली, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
‘श्रीराम जय जय राम’ची घोषणाबाजी
कलश यात्रेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजप तसेच शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या यात्रेत ‘श्री राम जय जय राम’ची घोषणाबाजी सुरू होती. यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. यात्रेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि ठाण्यात आलेल्या कारसेवा यात्रेत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी चांदीची वीट देऊन ती अयोध्येला पाठविली होती. त्यामुळेच ठाण्याचे आणि अयोध्येचे एक जुने नाते आहे.
ठाण्यात कलशाचे पूजन
अयोध्येहून आणलेल्या कलशाचे तसेच अक्षतांचे ठाण्यात मिरवणुकीनंतर पूजन करण्यात आले. याच अक्षता आता घराेघरी निमंत्रणासाठी वाटप केल्या जाणार आहेत.
अयोध्येला येण्याचे निमंत्रण
राम मंदिर हा विषय देशाचा अभिमानही आहे. मोदी यांच्यामुळे मंदिर झाले. हे मंदिर २२ जानेवारीला खुले होईल. १ ते १० जानेवारी दरम्यान घरात अक्षतांच्या वाटपाने अयोध्येला येण्याचे निमंत्रण देणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री राजेंद्र पवार यांनी सांगितले.