Thane: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील वेबसिरीजला पायबंद घाला, अविनाश जाधव यांची मागणी
By जितेंद्र कालेकर | Published: August 23, 2024 04:58 PM2024-08-23T16:58:36+5:302024-08-23T16:59:07+5:30
Ban Obscene Web Series on OTT platforms: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटले आहे की, भारतीय संस्कृती, सभ्यता, कुटूंब व्यवस्था, नात्यातील संवेदनशीलता नष्ट हाेण्याआधी ओटीटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून सुरु असलेल्या सांस्कृतिक व्याभिचाराला सेन्साॅनच्या नियंत्रणात आणले जावे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन दाखविल्या जाणाऱ्या अश्लील वेबसिरीजला पायबंद घालण्यात यावा. त्यावर दाखविले जाणारे अतिरंजित, भडक, शिवराळ भाषा, नात्यांचा अनादर, पाशवी क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्राेत्साहित करणारे आहे. त्यामुळेच अशा वेबसिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्साॅर ठेवण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आले आहे. राज्यातील ४८ खासदारांनीही संसदेमध्ये आवाज उठविण्याचेही त्यांना पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शुक्रवारी दिली. हा प्रकार सेन्साॅरच्या नियंत्रणात आणला गेला नाहीतर मात्र मनसे स्टाईलने आंदाेलन केले जाईल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटले आहे की, भारतीय संस्कृती, सभ्यता, कुटूंब व्यवस्था, नात्यातील संवेदनशीलता नष्ट हाेण्याआधी ओटीटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून सुरु असलेल्या सांस्कृतिक व्याभिचाराला सेन्साॅनच्या नियंत्रणात आणले जावे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी भारतीय पारंपारिक शिक्षण व्यवस्था माेडीत काढून त्यांची नाेकरशाहीला अनुकूल शिक्षण व्यवस्था सुरु केली. ते परके हाेते, त्यामुळे तसे वागले. परंतू, सध्या स्वकीयांकडूनच ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन सादरीकरण स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही अश्लील, बीभत्स, क्राैर्याच्या सीमा ओलांडणारी दृश्ये दाखविली जातात, ती संतापजनक आहेत. भावी पिढीला काय वारसा, संस्कार देत आहाेत. या प्लॅटफॉर्मवरुन दाखविली जाणारी अतिरंजित दृश्ये गुन्हेगारीला प्राेत्साहित करणारी आहेत.
कुटूंबाने एकत्रित बसून बघण्यासारखी एकही कलाकृती अशा प्लॅटफॉर्मवर नाही. भारतीय हिंदू संस्कृती रसातळाला नेण्याचा कुटील डाव परकीयांकडून खेळला जात आहे का? याचाही शाेध घेण्याची गरत असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. काही लहान मुलांकडूनही अश्लील हावभाव, नृत्य करवून घेतले जाते, त्यावरही बालकामगार विराेधी कायद्याप्रमाणे बंदी आणली गेली पाहिजे. सीए टाॅपर या वेब मालिकेमध्येही आतापर्यंतच्या सर्वच भागांमध्ये लहान मुलांबाबतची दृश्ये अत्यंत संतापजनक आहेत. निव्वळ लाडकी बहिण याेजना राबविणे पुरे नसून त्यांच्यासह लेकराबाळांची सुरक्षाही महत्वाची आहे. संबंधित चॅनलशीही अशा दृश्यांना आळा घालण्याबाबत पत्रव्यवहार सुरु आहे. तरीही नियंत्रण न आणल्यास मनसे स्टाईल धडा शिकविण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.