ठाणे खाडीत ‘लांब चोचीचा पाणटिवळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 03:28 AM2018-03-03T03:28:51+5:302018-03-03T03:28:51+5:30
गेल्या वर्षी फक्त तीन दिवसांसाठी ठाणे खाडीत पहिल्यांदाच आलेला लांब चोचीचा पाणटिवळा यावर्षी परत आला असून पक्षिनिरीक्षक आणि पर्यटकांना तो खुणावत आहे.
- महेंद्र सुके
ठाणे : गेल्या वर्षी फक्त तीन दिवसांसाठी ठाणे खाडीत पहिल्यांदाच आलेला लांब चोचीचा पाणटिवळा यावर्षी परत आला असून पक्षिनिरीक्षक आणि पर्यटकांना तो खुणावत आहे.
गेल्या आठवड्यात वाट चुकून आलेल्या राखाडी डोक्याच्या टिटवीने पक्षिमित्रांचा वीकेण्ड साजरा केल्यानंतर या आठवड्यात आलेल्या लांब चोचीच्या पाणटिवळ्याने (लाँग बिल्ड डोविचर) ठाणे खाडीत येणाºया दुर्मीळ पक्ष्यांच्या वैभवात भर घातली आहे. ठाणे खाडीत दिवसेंदिवस अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन होऊ लागले आहे. हा पाणटिवळा मागच्या वर्षी तीन दिवस ठाणे खाडीत पहिल्यांदा दिसला होता. आता तो परतून आला आहे. २७ फेब्रुवारीला एका पक्षिनिरीक्षकाने ठाणे खाडीत ‘डोविचर’ दिसल्याची नोंद केल्यानंतर त्यास बघण्याकरिता पक्षिप्रेमींनी ठाणे खाडीत गर्दी केली; परंतु तो दिसला नाही. गुरुवारी पक्षिमित्र आणि अभ्यासक डॉ. सुधीर गायकवाड-इनामदार यांना दुपारच्या सत्रात हा पाणटिवळा दिसला आणि त्याचे व्यवस्थित छायाचित्रण त्यांनी केले. उत्तर अमेरिकेच्या टुंड्रापासून ते सायबेरियापर्यंत विणीचा प्रदेश असणाºया या पक्ष्याचे स्थलांतर मध्य ते दक्षिण अमेरिकेपर्यंतच सीमित असते. पश्चिम युरोपमध्ये याच्या काही नोंदी आहेत.
गॉडवीट (काळ्या शेपटीचा पाणटिवळा) या पक्ष्यापेक्षा आकाराने किंचित कमी असलेल्या, परंतु चोचीची लांबी त्यापेक्षा जास्त असलेल्या लांब चोचीच्या पाणटिवळ्याच्या भारतात फारच कमी नोंदी आहेत. महाराष्ट्रातही केवळ ठाणे खाडीतच त्याची नोंद झाली आहे. या दुर्मीळ पक्ष्याला बघण्यासाठी पुन्हा पक्षिमित्रांची गर्दी होणार आहे.