निवडणूक खर्चात ठाण्याची मुंबईवर मात
By admin | Published: January 24, 2017 05:41 AM2017-01-24T05:41:16+5:302017-01-24T05:41:16+5:30
ठाणे आणि मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची रणधुमाळी २१ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक
ठाणे : ठाणे आणि मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची रणधुमाळी २१ फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चासाठी मुंबईतील उमेदवारांसाठी प्रत्येकी पाच लाख आणि ठाण्यातील उमेदवारांसाठी चार लाख रुपयांचे बंधन घातले आहे. ठाण्यातील निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने लढवली जात असल्याने ठाण्यातील पक्षांना या खर्चाचा मोठा वाटा उचलावा लागणार आहे. मुंबईतील पक्ष-अपक्षांना एका प्रभागासाठी पाच आणि ठाण्यातील पक्ष-अपक्षांना एका प्रभागासाठी १६ लाख रु पये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे खर्चाबाबतीत देशाच्या आर्थिक राजधानीला ठाणे मागे टाकणार आहे.
राज्यातील २० जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांमध्ये २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. २३ फेब्रुवारीला निकाल लागेल. राज्य निवडणूक आयुक्तांनी ११ जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड या अ गटातील प्रमुख महानगरपालिकांचा समावेश आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त सहारिया यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्चाचे बंधन घातले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला पाच लाख रुपयांचे बंधन असणार आहे, तर ठाण्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी प्रत्येकी चार लाख रुपये असणार आहे. मात्र प्रभागांची वेगळी रचना यंदा खर्च वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे. (प्रतिनिधी)