ठाण्याचा बिहार होतोय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:57+5:302021-04-30T04:50:57+5:30
ठाणे : कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी एका खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीने दिली. यावरून ठाण्यातील विविध संघटनांच्या ...
ठाणे : कर्जाचा हप्ता थकविल्याने पत्नीला उचलून नेण्याची धमकी एका खासगी वित्तीय कंपनीच्या प्रतिनिधीने दिली. यावरून ठाण्यातील विविध संघटनांच्या महिलांमधून निषेधाचा सूर व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात घडलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, ठाण्याचे बिहार होत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अशी धमकी देणाऱ्यावर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
दहा लाखांच्या व्यावसायिक कर्जाचा हप्ता थकविल्यामुळे व्यावसायिकेच्या पत्नीला उचलून नेण्याची धमकी मॅन्टिफी फायनान्स कंपनीच्या राज शुक्ला या प्रतिनिधीने दिली होती. यावरून पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे. ही घटना दखलपात्र गुन्ह्याची असल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून त्या प्रतिनिधीला अटक करण्याची मागणी समस्थ महिलावर्गाकडून होत आहे. ही अत्यंत असंस्कृत आणि असभ्यपणाची लक्षणे आहे. महाराष्ट्राने स्त्रियांचा नेहमीच आदर केला आहे आणि अशी घटना महाराष्ट्रात घडत असेल तर त्या घटनेची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे, असे मतदेखील व्यक्त होत आहे.
---------------
हे अत्यंत असंस्कृत, असभ्य आणि विकृत लक्षण आहे. जर समोरची व्यक्ती हप्ते भरू शकत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. त्या वित्तीय कंपनीसोबत झालेल्या करारात बायको उचलून नेऊ असे लिहिले आहे का? पत्नीला उचलून नेऊ हे बोलणे हे असभ्य आहे. हा सर्व फाजिलपणा आहे. वित्तीय कंपनीचा जो प्रतिनिधी असा बोलला आहे त्याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा. पोलिसांनी योग्य कारवाई करून त्या प्रतिनिधीला अटक करावी. कायदेशीर कारवाई न करता कायदा हातात घेणे चुकीचे आहे.
- शारदा साठे, विश्वस्त,
पत्नीला उचलून नेऊ असे बोलणे हा मोठा गुन्हा आहे. मुळात आजची परिस्थिती पाहता कर्जाचा हप्ता भरण्याचा तगादा ती वित्तीय कंपनी लावू शकत नाही, तसे आदेशही आहेत. पत्नीला उचलून नेऊ असे म्हणणाऱ्याला अटक झालीच पाहिजे. ही तर माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आपण कोणत्या काळात आहोत ?
- वंदना शिंदे, सदस्य, भारतीय महिला फेडरेशन
अशी धमी देणे यावरून महाराष्ट्र मागे जातोय का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र हे सुसंकृत राज्य आहे. चांगल्या गोष्टींची प्रथा महाराष्ट्राने पाडली आहे. आता महाराष्ट्राचा बिहार होतोय का? असे वाटत आहे. जर असे बोलू शकत तर त्यांची मानसिकता तशीच आहे. अशा लोकांवर कोणाचाही वचक किंवा धाक राहिलेला नाहीये.
- सुमीता दिघे, सामाजिक कार्यकर्त्या
आताच्या काळात अशी दिली जाणारी धमकी ऐकल्यावर विचित्र वाटत आहे. जुलूमशाही परत आली की काय असे वाटत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे.
- यामिनी पानगावकर, लेखिका